7 MLAs quit AAP ahead of Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पालम येथील आमदार भावना गौर यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपण पक्षावरील विश्वास गमावल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. कस्तुरबा नगर येथील आमदार मदन लाल यांनी देखील हीच भावना व्यक्त केली आहे.

“मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, कारण माझा तुमच्यावर आणि पक्षावरील विश्वास उडाला आहे. कृपया तो स्वीकारा,” असे भावना गौर यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.

या आमदारांचाही समावेश

त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तुरबा नगरचे आमदार मदन लाल आणि मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनीही आम आदमी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा आणि बिजवासनचे आमदार बीएस जून यांनी देखील पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व आमदारांना आम आदमी पक्षाने २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अधिकृत यादीनुसार पक्षाने आदर्श नगर येथून मुकेश गोयल यांना संधी दिली आहे. तर प्रविण कुमार यांना जनकपुरी, सुरेंद्र भारद्वाज यांना बिजनवास, जोगींदर सोलंकी यांना पालम, रमेश पेहलवान यांना कस्तुरबा नगर, नरेश यादव यांना मेहरौली आणि अनजना पर्चा यांना त्रिलोकपुरी येथून तिकीट देण्यात आले आहे.