Delhi Blast Suspect Dr. Shaheen Sayeed Husband Statement: काही दिवसांपूर्वी दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयितांपैकी एक असलेल्या डॉ. शाहीन सईदचे विभक्त पती डॉ. हयात जफर यांनी तिच्या कथित दहशतवादी संबंधांबद्दल त्यांना कोणतीही माहिती नव्हती, असे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ते लग्नानंतर नऊ वर्षे एकत्र होते. पण डॉ. शाहीनने जेव्हा परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांच्यातील संबंध ताणले गेले.

“आम्ही विवाहित होतो आणि शांततेत राहत होतो. आम्हाला दोन मुले आहेत. कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. तिचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची मला कोणतीही माहिती नव्हती”, असे संशयित डॉ. शाहीनचे घटस्फोटित पती डॉ. हयात जफर यांनी सांगितले.

“आमचे लग्न ९ वर्षांपूर्वी झाले होते. तिला परदेशात जायचे होते म्हणून आमचा घटस्फोट झाला. मी तिला सांगितले की, आपण इथेच राहू कारण आमचे सर्व नातेवाईक इथे आहेत. परदेशात गेलो तर आम्हाला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकला असता”, असे ते पुढे म्हणाले.

पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंध असलेल्या दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणल्यानंतर डॉ. शाहीनसह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर काही तासांतच दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

सुरुवातीच्या तपासानुसार, सोमवारी डॉ. उमर नबी चालवत असलेल्या हुंडई आय२० कारमध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला होता. पोलिसांना असा संशय आहे की, आरोपींना २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखा हल्ला करायचा होता.

घटनास्थळावरून ४० हून अधिक नमुने गोळा करणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पथकांनी सांगितले की, प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून येते की स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेट वापरले असण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन या हल्ल्यातील पीडितांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकर शोधून शिक्षा देण्यात येईल, असे एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले.

दरम्यान, सरकारने या कार स्फोटाला “घृणास्पद दहशतवादी घटना” म्हटले असून तपास यंत्रणांना या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.