ऑगस्ट २०२३ मध्ये एका २४ वर्षीय मुलीचं लग्न झालं. त्यानंतर ती नवऱ्यासह लंडन या ठिकाणी गेली. तिथे तिचा नवरा एका सिक्युरिटी फर्मसाठी काम करत होता. त्याचं कुटुंब जझ्झर येथील होतं. तर २४ वर्षांची ही तरुणी दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातली होती तिचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तिच्या बहिणीचाही विवाह झाला होता. २४ वर्षांच्या या तरुणीचं लग्न नोंदणी पद्धतीने ऑगस्ट २०२३ मध्ये झालं आणि त्यानंतर तिचा नवरा ऑक्टोबर २०२३ मध्ये लंडनला गेला. त्यानंतर गेल्यावर्षी म्हणजेच मार्च २०२४ मध्ये तो दिल्लीत परत आला. त्यावेळी या दोघांचा विवाह हिंदू पद्धतीने करण्यात आला. ३० एप्रिल २०२४ ला लंडनला गेले. तिथे गेल्यावर ही तरुणीही तिकडे नोकरी करु लागली होती.

ऑगस्ट २०२४ मध्ये काय घडलं?

सगळं काही सुरळीत चाललं होतं. तरुणीचा २५ वा वाढदिवस डिसेंबर महिन्यात होणार होता. त्याआधी होणाऱ्या सणवारांची तयारी त्यांचया घरात चालली होती. अशातच विवाहितेला हे समजलं की तिचा नवरा कुठल्याही कंपनीत काम करत नाही. ऑगस्ट २०२४ पासून तिचं आयुष्य बदललं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तिच्या आई वडिलांनी तिला व्हिडीओ कॉल केला त्यावेळी तिने सांगितलं माझा नवरा येतो आहे. त्यामुळे मी फोन ठेवते, मी सध्या स्वयंपाक करते आहे. १० नोव्हेंबर २०२४ ला तिने फोन ठेवला. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी या महिलेचा मृतदेह आढळून आला.

१४ नोव्हेंबर २०२४ ला काय घडलं?

१४ नोव्हेंबरला या महिलेचा मृतदेह तिच्या पतीच्या कारमध्ये आढळून आला. ही कार लंडनच्या पूर्व भागात असलेल्या ब्रिस्बेन रोडवर पोलिसांना सापडली. पोलिसांनी तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की या विवाहितेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तिचा नवरा हा मुख्य संशयित आहे. मात्र त्याने हे सगळं घडण्याआधीच लंडन सोडलं. ११ नोव्हेंबर २०२४ ला या महिलेचा पती रात्री ८.३० च्या विमानाने हेथ्रो विमानतळावरुन मुंबईला आला. मुंबईहून त्याने दिल्लीसाठी दुसऱ्या विमानाने प्रवास केला. दिल्ली आणि युके पोलिसांनी त्यांचा हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. विवाहितेच्या कुटुंबाने जावयाने हुंडा मागितल्याचे आरोप केले होते. तसंच आमच्या मुलीची हत्या हुंड्यासाठीच करण्यात आली असंही दिल्ली पोलिसांना सांगितलं. १४ मार्च २०२५ ला मुलीच्या सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तिच्या बहिणीला त्यांच्या दोन नातेवाईकांनाही पोलिसांनी अटक केली. तसंच दिल्लीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याचं या प्रकरणात निलंबनही करण्यात आलं. सद्यस्थितीत मुलीच्या सासूला जामीन मिळाला आहे तर तिचे सासरे न्यायालयीन कोठडीत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेच्या पती विरोधात लुक आऊट नोटीस

मार्च २०२५ या महिन्यात महिलेचा पती गुडगाव या ठिकाणी पैसे काढताना दिसला होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली. मात्र अद्यापही या महिलेचा पती आढळून आलेला नाही. लंडनमध्ये या महिलेच्या पतीविरोधात बलात्कार, लैंगिक शोषण या संबंधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.