Delhi Building Collapse : दिल्लीच्या ठाणे वेलकम परिसरामधील जनता मजदूर कॉलनीमध्ये शनिवारी एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या इमारतीखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इमारतीत राहणाऱ्या दहा सदस्यांसह इमारत कोसळण्याच्या वेळी जवळ असलेले काही लोक अडकले होते.

दिल्ली अग्निशमन दलाने ही चार मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली एक पुरूष आणि एक महिला मृत आढळल्याची पुष्टी केली आहे. त्यांचे मृतदेह जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच ८ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

ही घटना घडल्यानंतर सात अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून बचावकार्य सुरू आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्हाला सकाळी ७ वाजता इमारत कोसळल्याचा फोन आला. त्यानंतर सात अग्निशमन दलाच्या गाड्यांसह आमचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे. अधिक तपशील बाकी आहे”, असं पोलीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा तेथील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, “ही जनता कॉलनी आहे. सकाळी ७:४५ वाजले होते, मी आराम करत होते आणि अचानक एक मोठा आवाज ऐकू आला. मी बाहेर आलो आणि आजूबाजूला धुळीचे लोट दिसले. तेव्हा सगळे मोठ्याने ओरडू लागले, रडू लागले. हे घडले तेव्हा येथे किती लोक उपस्थित होते हे मला माहित नाही. त्यांच्या कुटुंबात १० लोक होते, ढिगाऱ्याखाली किती लोक आहेत हे मला माहित नाही”, असं तिने पीटीआयला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

उत्तर दिल्लीतही तीन इमारती कोसळ्याने एकाचा मृत्यू

उत्तर दिल्लीतील आझाद मार्केटमधील दिल्ली मेट्रो बोगदा बांधकामाजवळ शुक्रवारी पहाटे तीन जुन्या व्यावसायिक इमारती कोसळल्या. या घटनेत एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या जनकपुरी पश्चिम-आरके आश्रम मार्ग कॉरिडॉर परिसरात ही घटना घडली.