मद्यसम्राट विजय मल्या यांना विदेशी चलन नियमन कायद्याचा (फेरा) कथितरीत्या भंग केल्याच्या एका प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून दिलेली सूट दिल्लीच्या एका न्यायालयाने रद्द केली असून, त्यांना ९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
१९९६ ते १९९८ या कालावधीत लंडन व काही युरोपीय देशांमध्ये फॉम्र्युला-वन जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये ‘किंगफिशर’चा लोगो वापरल्याबद्दल एका ब्रिटिश फर्मला कथितरीत्या २ लाख डॉलर्सची रक्कम दिल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्या यांना समन्स जारी करूनही ते हजर न झाल्यामुळे ईडीने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ‘फेरा’ कायद्याचा भंग करून रिझव्र्ह बँकेच्या परवानगीशिवाय ही रक्कम देण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे होते. खटल्यात त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगून, मल्या यांना प्रत्येक सुनावणीच्या वेळेस उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती ईडीने केली होती.
