Delhi Court Judge Poem: दिल्लीतील एका न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आईच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला जामीन मंजूर करताना त्यांच्या निकालाला काव्यात्मक स्पर्श दिला आहे.
रोहिणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी रोहित कुमार यांनी शुक्रवारी मालमत्तेच्या वादाशी संबंधित एका प्रकरणात नितीन सोनी या व्यक्तीला जामीन मंजूर केला. सोनी यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या आईच्या मालमत्तेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला आहे. याबाबत लाइव लॉ ने वृत्त दिले आहे.
‘जंग मिल्कियत’ या शीर्षकाच्या आदेशात स्वतःची कविता वाचताना न्यायाधीश म्हणाले, “मिल्कियत की जंग में ना जाने कितने अफसाने हुए, कुछ ही अपने थे, वो भी अब बेगाने हुए। बनके कृष्ण, अब किसी को आना होगा, लड़ते, लड़ते, बिगड़ते रिश्तों को बचाना होगा। ना जाने ये जंग और कितनी महाभारत लाएंगी। आख़िर कितनों को सलाख़ों तक ले जाएगी।”
कवितेच्या पुढच्या काही ओळींमध्ये ते म्हणाले, “विरासत की लड़ाई में अनगिनत कहानियाँ सामने आई हैं। जो कुछ अपने थे, वे अब पराये हो गए हैं। इन सड़ते, लड़ते और टूटते रिश्तों को बचाने के लिए अब किसी को आना होगा, जैसे कृष्ण आए थे। कौन जानता है कि यह लड़ाई और कितने महाभारत लाएगी, और कितनों को सलाखों के पीछे ले जाएगी।”
या प्रकरणात सोनी यांना १२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनुसार, तक्रारदार असलेल्या त्यांच्या आईच्या नावे असलेल्या वादग्रस्त मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत न्यायालयाने यापूर्वी निर्देश जारी केले होते, असे लाइव लॉ ने वृत्त दिले आहे.
पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याविरुद्ध अनेक पीसीआर कॉल, तक्रारी आणि नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट्स दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, यावेळी सोनी यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, हा बेकायदेशीर ताब्याचा खटला नाही. ते म्हणाले की, त्यांच्या आईने तोंडी कराराच्या आधारे स्वेच्छेने मालमत्तेचा ताबा त्याला दिला होता. पुढे असेही सादर करण्यात आले की, सोनी आणि त्याचे कुटुंब १० जुलैपूर्वीपासून वादग्रस्त मालमत्तेत राहत असल्याचे काही फोटो आहेत.