Delhi Police nab suspect behind Red Fort Robbery : दिल्लीमधील लाल किल्ला संकुलातून एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या कलशाची चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र, गुन्हे अन्वेशन विभागाने या चोरीच्या घटनेचा छडा लावला आहे. त्यांनी चोराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडील सोन्याचा कलश ताब्यात घेतला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी या चोराचे फोटो मिळवले. त्यानंतर त्याची माहिती शोधून तपास सुरू केला आणि सोमवारी पहाटे त्याला उत्तर प्रदेशमधील हापूड येथून अटक केली.
दरम्यान, पोलीस चौकशीत आरोपीने केलेला खुलासा ऐकून पोलिसांना धक्का बसला आहे. कारण चोराने सांगितलं की पूजेच्या ठिकाणावरून एक नव्हे तर तीन कलश चोरीला गेले आहेत. अद्याप पोलिसांनी केवळ एकच कलश जप्त केला असून अन्य दोन कलशांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आणखी काही ठिकाणी छापेमारी होऊ शकते.
७६० ग्रॅम सोन्यापासून बनवलेला रत्नजडीत कलशाची चोरी
लाल किल्ल्यात आयोजित जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमावेळी एका चोराने पूजेच्या ठिकाणावरून तब्बल एक कोटी रुपये किमतीचा सोन्याचा रत्नजडित कलश (पवित्र पात्र) पळवला होता. ७६० ग्रॅम सोन्यापासून बनवण्यात आलेला व १५० ग्रॅमचे हिरे जडवलेला, तसेच माणिक व पाचूंनी सजवलेला हा कलश प्रसिद्ध उद्योगपती सुधीर जैन यांनी कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या दैनंदिन पूजेसाठी कार्यक्रमस्थळी ठेवला होता. मात्र, कार्यक्रमाला जमलेल्या इतर जैन साधूंच्या वेशात पूजेच्या ठिकाणी दाखल झालेल्या एका चोराने तो कलश लंपास केला होता.
‘अशी’ केली चोरी
या घटनेचा तपास करताना सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आलं की जैन साधूंप्रमाणे वेश धारण केलेल्या एका भामट्याने सर्वांची नजर चुकवून पटकन पूजेच्या ठिकाणावरून सोन्याचा कलश उचलला आणि त्याच्या झोळीत टाकला. त्यानंतर काही मिनिटात त्याने तिथून पळ काढला.
लाल किल्ल्यात जैन समुदायाचा एक धार्मिक कार्यक्रम चालू असून ९ सप्टेंबरपर्यंत तो चालू राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान दैनंदिन प्रार्थनेसाठी सदर कलश वापरला जात होता. काही धार्मिक विधींसाठी या कलशाचा वापर केला जात होता. मात्र, एका भामट्याची त्यावर नजर पडली आणि त्याने गर्दीचा फायदा घेत तो कलश लंपास केला. मात्र आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.