केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काढण्यात आलेल्या, ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान मोठा हिंसाचार घडला. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेच नुकसान तर झालंच शिवाय ३०० पेक्षा जास्त पोलीस देखील जखमी झाले. एवढच नाही तर आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढून त्या ठिकाणी तोडफोड करत, विविध झेंडे देखील फडकवले. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलिसांकडून कडक पावलं उचलली जात असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी २० शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवली असून, उत्तर देण्यासाठी त्यांना तीन दिवासांचा अवधी देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही, असा दावा करत हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, अशा शब्दांत कडक कारवाईचा इशारा कालच दिल्ली पोलिसांकडून जाहीर पत्रकारपरिषदेतून देण्यात आला होता.

“कुणी लाल किल्ल्यावर पोहचतं आणि पोलिसांची एक गोळी देखील चालत नाही…”

यानंतर आज योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा, बलबीर एस राजवाल व भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्यासह २० शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलीस व शेतकरी नेत्यांमध्ये जो करार झाला होता, तो शेतकरी नेत्यांनी मोडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शिवाय, या नोटीसीला उत्तर देण्यासाठी शेतकरी नेत्यांना तीन दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे.

दिल्ली पोलिसांकडून राकेश टिकैत यांना नोटीसीद्वारे विचारण्यात आलं आहे की, प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलिसांबरोबर केलेला कराराचा भंग केल्याबद्दल तुमच्या विरोधात का कायदेशीर कारवाई केली जाऊ नये?

शेतकरी नेत्यांनी वचन पाळलं नाही, दोषींना सोडणार नाही – दिल्ली पोलीस

तर, “शेतकरी नेत्यांना काही अटींवर ट्रॅक्टर परेडची परवानगी देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या मार्ग सोडून पोलिसांनी लावलेली बॅरिकेट्स तोडून प्रतिबंधित भागात प्रवेश केला. शेतकरी नेत्यांनी आम्ही सांगितलं होतं की, त्यांनी कुंडली, मानेसर, पलवल या मार्गावरच ट्रॅक्टर परेड काढावी. मात्र, शेतकरी दिल्लीतच ट्रॅक्टर परेड काढण्यावर ठाम होते.” असं काल दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं होतं.

शेतकरी आंदोलनात फूट; भारतीय किसान युनियन, राष्ट्रीय मजदूर संघाची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचे समोर आलं आहे. भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली आहे.

ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रद्द!

तसेच, प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सीमेवर काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता बजेटच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police issued notices to at least 20 farmer leaders msr
First published on: 28-01-2021 at 14:17 IST