लोकशाहीचे सर्वात मोठे सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. दिल्लीत एकूण १.२३ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ६८.५ लाख पुरुष तर ५४ लाख महिला मतदार आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर आज मंगळवापर्यंत सुमारे ७ हजार ५६५ लिटर मद्य निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केले आहे. याशिवाय १ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.  मतदानाची एकूण टक्केवारी २००८ च्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.
प्रचाराची मुदत सोमवारी संपल्यानंतर सर्वच उमेदवारांनी आजचा दिवस आपापल्या मतदारसंघात घालवला. मुख्यमंत्री शीला दीक्षित, भाजपचे हर्षवर्धन, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराऐवजी आपापल्या जवळच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
 ‘एक बूथ, दस यूथ’ या भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सुचविलेल्या संकल्पनेला दिल्लीत आजमावण्यात येणार आहे. भाजपसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार सक्रिय झाला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ‘शत प्रतिशत मतदान’ हा संदेश घेऊन संघ परिवारातील कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात फिरत आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे.  तब्बल ३५ हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नेमण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
मतदारांच्या सोयीसाठी एरव्ही सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या मेट्रो फेऱ्या पहाटे चार वाजेपासून सुरू होतील. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांना राजपत्रित सुटी घोषित करण्यात आली आहे. खासगी संस्थांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच्या वेळेपेक्षा दोन तास उशिरा येण्याची मुभा दिली आहे.