Delhi- Pune Air India Flight Bird Hit: एअर इंडियाच्या दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानाला शुक्रवारी पक्षी धडकल्याने, विमान कंपनीला परतीचा प्रवास रद्द करावा लागला आहे. विमान सुरक्षितपणे उतरले असून, पुण्यात उतरल्यानंतर पक्षी धडकल्याचे आढळून आले. दरम्यान, अभियांत्रिकी पथकाकडून विमानाची तपासणी केली जात आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.
“२० जून रोजी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एआय-२४७० या विमानाला पक्षाने धडक दिल्याचे आढळून आल्यानंतर, या विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. हे विमान पुण्यात सुरक्षितपणे उतरल्यानंतर पक्षी धडकल्याचे आढळले,” असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, विमानाचा परतीचा प्रवास रद्द झाल्यामुळे विमान कंपनीने अडकलेल्या प्रवाशांसाठी राहण्याच्या व्यवस्थेसह इतर सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याचेही म्हटले आहे. याचबरोबर, ज्या प्रवाशांना प्रवास रद्द करायचा आहे, त्यांना रिफंडचा पर्यायही देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण
दरम्यान काही दिवसांपूर्वी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघातानंतर, हवाई प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचबरोबर जगभरातील विविध भागांत भू-राजकीय तणावासारख्या इतर घटकांमुळेही प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदाबाद अपघातानंतर प्रवाशी घटले
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एका अहवालात म्हटले आहे की, जूनमध्ये विमान वाहतूक मंत्रालयाच्या प्रवाशांच्या प्रवासाच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
“विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या दैनिक आकडेवारीनुसार, भारत-पाकिस्तान भू-राजकीय संघर्षानंतर मे २०२५ मध्ये सरासरी दैनंदीन प्रवाशांमध्ये घट झाली होती. पण, शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर, देशांतर्गत हवाई प्रवास सामान्य झाला. १२ जून २०२५ रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सरासरी दैनिक प्रवाशांमध्ये पुन्हा घट झाली,” असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात नमूद केले आहे.
या अहवालानुसार, या वर्षी एप्रिलमध्ये सरासरी दैनंदीन प्रवाशांची संख्या ४९० हजार होती, पण, मे २०२५ मध्ये घट दिसून आली.
१२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर, एअर इंडियाने त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये १५% कपात करण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे उड्डाणपूर्व सुरक्षा तपासणीत आणि उड्डाण कालावधीत वाढ झाल्यामुळे एअर इंडियाने २१ जून ते १५ जुलै २०२५ पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरती कपात करण्याची घोषणा केली आहे.