पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी उमर खालिद, शरजील इमाम यांच्यासह सात जणांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. बेकायदा कृती प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

न्यायाधीश नवीन चावला आणि शालिंदर कौर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणातील युक्तिवाद आधीच पूर्ण झाले होते. जुलैमध्ये या प्रकरणावरचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. मंगळवारी त्याचे वाचन करण्यात आले. उमर खालिद, शरजील इमाम, अतर खान, खालिद सैफी, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, मीरान हैदर, गुलफिशा फातिमा आणि शादाब अहमद या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र हे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोपी २०२० पासून तुरुंगात आहेत आणि त्यांनी त्यांच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सरकारी वकिलांनी जामीन अर्जांना विरोध करत म्हटले होते की हा स्वयंस्फूर्त दंगलींचा खटला नाही तर या दंगली आधीच नियोजित केल्या होत्या. घृणास्पद हेतू आणि सुनियोजित कट रचून या दंगली घडवून आणल्या. सरकारी वकिलांचे प्रतिनिधित्व करणारे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनीही हा जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचा कट होता. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करून जामीन अर्ज फेटाळला.