Delhi scrap dealer arrested by UP ATS on espionage charge : हेरगिरी केल्याच्या आरोपात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सीलमपूर येथील भंगार विक्रेता मोहम्मद हारून (४५) याला अटक केली आहे. याच्या दोन दिवसांनंतर या अटक केलेल्या संशयिताच्या कुटुंबियांनी त्याला अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानात असल्याने तो तिकडे जात असे असा दावाही त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाचे म्हणणे आहे की, हारून याचे पाकिस्तानी एजन्सीशी संबंध होते आणि त्याने भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधीची महत्त्वाची माहिती त्यांना दिली
एटीएसने सांगितले की हारून हा पाकिस्तानी दुतावासातील कर्मचाऱ्याबरोबर मिळून काम करत होता. तसेच हारून हा पाकिस्तानातील कुटुंबाच्या संपर्कात होता, त्यांना भेट देण्यासाठी त्याला व्हिसाची गरज होती. हारून दुतावासातील कर्मचार्याला संपर्क करत असे जो त्याच्या बँक खात्याचा वापर पैसे जमा करत असे, असेही सांगण्यात आले.
एटीएसने असेही सांगितले की हारूनला पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा हवा असलेल्या लोकांना पाठवण्यासाठी पाकिस्तानी दुतावासातील कर्मचाऱ्याकडून पैसे मिळत होते. याबरोबरच हारून याला कमिशन देखील मिळत होते, एटीएसच्या म्हणण्यांनुसार या कमिशनचा वापर देशविरोधी कारवायांसाठी निधी म्हणून केला जात होता.
एटीएसने स्पष्ट केले की उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याला भारत सरकारने ‘पर्सोना नॉन ग्रेटा’ घोषित करत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
सीलमपूरमधील त्यांच्या घराबाहेर ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना हारूनचा भाऊ वसीमने शुक्रवारी सांगितले की , “माझा भाऊ आमच्यात आर्थिकदृष्ट्या सर्वात कमकुवत होता. आम्ही चार भाऊ आहोत. तो आमच्या घरातूनच एक भंगाराचे दुकान चालवत असे.”
साध्या वेशात असलेले पोलीस कर्मचारी बुधवारी घरी आले आणि हारूनला प्रश्न विचारण्यासाठी कारपर्यंत येण्यास सांगितले तेव्हा वसीम उपस्थित होता. त्याने सांगितले की, “त्यांनी (पोलिसांनी) त्याला तो नुकतेच पाकिस्तानला गेल्याबद्दल विचारले. माझ्या भावाने सांगितले की तो त्याच्या पत्नीला भेटायला गेला होता, जी गुजरानवाला येथे राहते… त्यांनी त्याला काळजी करू नको असे म्हणत कारमध्ये बसायला सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला घेऊन गेले.”
वसीम आणि त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलिसांना मदतीसाठी फोन केला, त्यानंतर त्यांना बुधवारी रात्री सांगण्यात आले की त्याचा भाऊ हा नोएडा येथे एटीएसकडे आहे. “दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता, आम्हाला एटीएसकडून फोन आला, ज्यामध्ये आम्हाला त्याला भेटण्यासाठी लखनौला येण्यास सांगण्यात आले,” असे वसीम म्हणाला.
हारूनला भेटलेल्या भावाने सांगितले की, तो फक्त मी निर्दोष आहे आणि मला अडकवलं जात आहे इतकंच म्हणत आहे, असे वसीमने सांगितले. दरम्यान वकिलांनी कुटुंबियांना सांगितले की हारून विरोधात बीएनएस कलम १४८ आणि १५२ अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे .
वसीमने सांगितलं की हारुन याचे कुटुंब खरोखरच पाकिस्तानात आहे. त्याच्या भावाने दोनदा लग्न केलं आहे. पहिलं लग्न २००७ साली दिल्लीतील एका महिलेशी त्याचं लग्न झालं, जिच्यापासून त्याला तीन मुले आहेत आणि त्यानंतर त्याने नुकतेच पाकिस्तानातील चुलत बहिणीशी लग्न केले. हे लग्न लॉकडाऊनच्या सुमारास झालं असेही वसीम याने सांगितले.
त्याने पहिल्यांदा ही बाब लपवून ठेवली. पण आमच्या लक्षात आले की तो सतत पाकिस्तानात जात आहे, नेमकं काय सुरू आहे याबद्दल आम्ही त्याला विचारणा केली. मग त्याने आम्हाला सांगितले की त्याने नात्यातील मुलीशी लग्न केले आहे, कारण तिच्या पतीने तिला घटस्फोट देवून सोडून दिले होते… तो तिला आणि तिच्या कुटुंबाला मदत करू इच्छित होता, असे वसीमने सांगितले. हारूनला तिला दिल्लीत घेऊन यायचे होते, पण ते शक्य झाले नाही, असेही त्याने सांगितले.