लॉरेंन्स बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड दीपक बॉक्सरला मेक्सिकोतून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस दलातले पाच अधिकारी हे मेक्सिकोला गेले होते. तिथून दीपक बॉक्सरला दिल्लीत आणण्यात आलं आहे. दीपक बॉक्सर हा बनावट पासपोर्टच्या आधारे मेक्सिकोला पळाला होता. तो मेक्सिकोहूनही पळून जाणार होता. मात्र FBI च्या मदतीने दीपक बॉक्सरला अटक करण्यात आली आहे त्याला भारतात आणण्यात आलं आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोईनेच दीपक बॉक्सरला पळून जाण्यासाठी मदत केली होती. दीपक बॉक्सर सिव्हिल लाईन्समध्ये राहणाऱ्या बिल्डरच्या हत्या प्रकरणात वाँटेड होता. बिल्डर अमित गुप्ता यांच्या हत्या प्रकरणातही दीपक बॉक्सरचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली-NCR चा कुख्यात गँगस्टर दीपक बॉक्सरने जितेंद्र गोगीच्या हत्येनंतर गोगी गँगचं प्रमुख पद सांभाळलं होतं. दीपक बॉक्सरने मुरादाबाद या ठिकाणाहून रवि अंटिल या नावाने बनावट पासपोर्ट तयार केला होता. पोलिसांनी सांगितलं की दीपक बॉक्सर २९ जानेवारी २०२३ ला मेक्सिकोला पळाला होता.

दीपक बॉक्सर फरार झाल्याचं कळताच शोध मोहीम

दीपक बॉक्सर भारताबाहेर फरार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. दीपक बॉक्सर हा लॉरेंन्स बिश्नोई गँगचा कुख्यात अपराधी आहे. बॉक्सर आणि त्याच्या गँगच्या विरोधात १६ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक बॉक्सर मेक्सिकोला पळाल्याचं समजताच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. त्याला मेक्सिकोहून अमेरिकेत पळून जायचं होतं. अमेरिकेत पोहचून तो तिथून दिल्लीतली गँग चालवणार होता. मात्र त्याआधीच त्याला अटक करण्यात आली आहे.

कोण आहे दीपक बॉक्सर?

हरियाणाच्या सोनीपतमध्ये राहणारा दीपक पहल हा दीपक बॉक्सर नावाचा कुख्यात गुंड झाला. खरं तर तो राष्ट्रीय स्तरावरचा बॉक्सिंग चँपियनठरला होता. मात्र गुन्हेगारी जगतात त्याची एंटी २०१४-१५ च्या दरम्यान झाली. जितेंद्र मान उर्फ गोगी गँगशी जोडल्या गेलेल्या मोहितशी त्याची ओळख झाली आणि त्यानंतर दीपक बॉक्सर गुन्हेगारी विश्वात गेला. त्या विश्वात त्याला दीपक बॉक्सर हेच नाव पडलं. २०१६ मध्ये दीपक बॉक्सरला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. २०१७ मध्ये दीपक जामिनावर बाहेर आलला. त्यानंतर त्याने त्याच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा सुरू केल्या. २०२१ मध्ये गोगीचा एका शूटआऊटमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर गोगी गँगचा म्होरक्या झाला तो दीपक बॉक्सर. दीपक लॉरेंन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासोबत काम करू लागला. या वर्षी जानेवारी महिन्यात तो मेक्सिकोला पळाला होता. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे.