Passengers wants 11A seat after Air India Plan Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कमी वेळात दूरवरचा प्रवास शक्य असल्यामुळं हवाई प्रवासाला दुसरा पर्याय नाही. त्यामुळं प्रवाशांनी आता वेगळी शक्कल लढवली आहे. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात ११ए या सीटवर बसलेले प्रवासी विश्वासकुमार रमेश चमत्कारीकरित्या वाचले. यानंतर आता सर्वच विमान कंपन्यांचे तिकीट बुक करताना प्रवाशांकडून ११ए या सीटची मागणी वाढली आहे.

११ए ही सीट आपत्कालीन मार्गाजवळ असलेल्या या सीटचे तिकीट दर अधिक असतात. कारण प्रवाशांना पाय लांबून बसण्याची सोय असते. तसेच विमानाचा प्रकार आणि विमानातील वर्गाच्या वर्गीकरणानुसार आपत्कालीन मार्गाजवळील आसन क्रमांक बदलत असतात.

विमान वाहतूक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विमान अपघात झाल्यास आपत्कालीन मार्गाजवळील आसन अतिरिक्त सुरक्षा पुरवतात हा फक्त भ्रम आहे. पण एअर इंडियाच्या अपघातानंतर आता आपत्कालीन मार्गाजवळील आसन प्रवाशांसाठी मानसिक समाधान देणाऱ्या ठरत आहेत.

एक्झिट मार्गावर नसली तरी ११ए सीट हवी

गुरुवारपर्यंत अनेक विमान प्रवाशांना आपत्कालीन द्वार असलेली ११ए ही सीट नको होती. कारण त्यावर आरामदायी पद्धतीने बसता येत नाही, असे काहींचे म्हणणे असते. तर काहींना आपत्कालीन परिस्थितीत एक्झिट डोअर कसा उघडायचे, हे माहीत नसते. अशाप्रकारे विविध कारणांसाठी या सीट नाकारल्या जात होत्या.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार कोलकातामधील ट्रॅव्हल एजंट्सनी सांगितले की, नेहमी प्रवास करणारे प्रवासी आपत्कालीन द्वार असलेल्या ठिकाणची जागा निवडत आहेत. यासाठी अधिक पैसे मोजण्यासही त्यांची हरकत नाही. तसेच गुरुवारच्या अपघातानंतर आता इतरांनीही या जागांबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली आहे.

ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समिती सदस्य अनिल पंजाबी यांनी सांगितले की, आपत्कालीन द्वाराजवळ असलेल्या सीटबद्दलच्या प्रश्नांमध्ये आता वाढ झाली आहे. तर काहींना ११ए ही सीट हवी असते जरी ती आपत्कालीन द्वाराच्या शेजारी नसली तरी, असेही ते म्हणाले.

११ए सीटचा इतिहास

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई विमानतळावरून १२ जून रोजी एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण घेतलं. पण अवघ्या ३० सेकंदात हे विमान मेघानी नगर येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. विमान कोसळताच विमानातील एक लाख लीटरहून अधिक असलेल्या इंधनाच्या साठ्याचा मोठा स्फोट झाला. ज्यात विमानात प्रवास करत असलेल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच विमानात ११ए या सीटवर बसलेले विश्वासकुमार रमेश जिवंत वाचले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२७ वर्षांपूर्वी थायलंडमध्ये झालेल्या विमान अपघातामधून अभिनेते आणि गायक रुआंगसाक लोयचुसाक हेदेखील सुखरुप बचावले होते. योगायोग म्हणजे विश्वासकुमार रमेश ज्या ११ए सीटवर बसले होते, त्याच सीटवरून रुआंगसाक लोयचुसाक हेदेखील प्रवास करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.