तामिळनाडूत सर्वपक्षीय बैठकीतील मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कावेरी प्रश्नावर राज्य सरकारने तामिळनाडू विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी द्रमुकने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली.

द्रमुकचे नेते आणि विरोधी पक्षनेते एम. के. स्टालिन यांनी बोलाविलेल्या या बैठकीवर सत्तारूढ अभाअद्रमुक, भाजप आणि त्यांच्या चार घटक पक्षांनी बहिष्कार टाकला होता. सदर बैठक ही द्रमुकने बोलाविलेली होती, स्टालिन यांनी दावा केल्याप्रमाणे सर्वपक्षीय नव्हती, असे अभाअद्रमुक आणि भाजपने म्हटले आहे.

द्रमुकचा घटक पक्ष असलेला काँग्रेस आणि आययूएमएल यासह जी. के. वासन यांच्या नेतृत्वाखालील तामिळ मनिला काँग्रेस आणि शेतकऱ्यांच्या काही संघटना बैठकीला हजर होत्या. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. कावेरी जलतंटा आयोगाने दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करीत नसल्याबद्दल या बैठकीत कर्नाटकवर जोरदार टीका करण्यात आली. केंद्र सरकारने याबाबत कर्नाटक सरकारला सल्ला दिला पाहिजे मात्र त्याऐवजी राजकीय उद्दिष्टांसाठी केंद्र त्यांना सहकार्य करीत आहे, अशी टीकाही बैठकीत करण्यात आली. अशा प्रकारच्या भूमिकेमुळे तामिळनाडूतील शेतकऱ्यांना समस्या भेडसावत असल्याने तामिळनाडू विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demanding special session of the tamil nadu assembly on cauvery issue
First published on: 26-10-2016 at 02:09 IST