नवी दिल्ली : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षांच्या प्रवासात अनेक कट-कारस्थाने, भीषण छळ, अन्याय सहन केला. पण, स्वयंसेवकांमध्ये कधीही कोणाही विरोधात कटुता आली नाही’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले. तसेच, देशासमोरील आव्हाने स्पष्ट करताना, ‘लोकसंख्येच्या रचनेत होत असलेला बदल हा सामाजिक ऐक्यासाठी घुसखोरीपेक्षाही मोठा धोका आहे, असा इशाराही मोदींनी दिला.
दिल्लीतील बुधवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये, संघाच्या शताब्दीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने विशेष टपाल तिकीट आणि १०० रुपयांचे स्मृतिचिन्ह नाणे प्रकाशित करण्यात आले. नाण्याच्या एका बाजूस राष्ट्रीय चिन्ह असून दुसऱ्या बाजूस वरद मुद्रा धारण केलेली भारतमाता, सिंह आणि तिला वंदन करणारे स्वयंसेवक दर्शविले आहेत. या वैशिष्ट्यांचा मोदींनी विशेष उल्लेख केला. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे उपस्थित होते.
देशासमोर एकता, संस्कृती आणि सुरक्षिततेला थेट धोका निर्माण केला जात आहे. त्याचा सावध राहून सामना करण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर ‘विविधतेतील एकता’ हा देशाचा आत्माच धोक्यात येईल. त्यामुळे हे तत्त्व मोडू न देता ते अधिक बळकट कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. संघाने केवळ ही आव्हाने ओळखली नाहीत तर, त्यांचा सामना करण्यासाठी ठोस रोडमॅप तयार केला आहे, असे मोदींनी सांगितले. शंभर वर्षांच्या संघाच्या कार्याचे कौतुक मोदींनी यावेळी केले.
पंतप्रधानांकडून यापूर्वीही उल्लेख
या दोन्ही मुद्द्यांचा ऊहापोह त्यांनी स्वातंत्र्यदिनीच्या लालकिल्ल्यावरील भाषणातही केला होता. मोदींनी लोकसंख्येच्या रचनेतील बदलाविरोधात मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. घुसखोर देशातील तरुणांचे रोजीरोटी हिरावून घेत आहेत. देशातील बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत, आदिवासींची दिशाभूल करतात आणि त्यांच्या जमिनी बळकावतात. देश ही घुसखोरी सहन करणार नाही, असे मोदी म्हणाले होते.