फडणवीस, शेलार दिल्लीत ; गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्रपणे चर्चा

फडणवीस आणि शेलार यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दिल्लीत येणार आहेत.

गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्रपणे चर्चा

नवी दिल्ली : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शुक्रवारी स्वतंत्रपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. शेलार यांनी संसदेत जाऊन शहा यांच्याशी चर्चा केली, तर फडणवीस यांनी मात्र शहा यांची दिल्लीत अन्यत्र भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमित शहा यांच्याशी चर्चा करून फडणवीस लगेचच मुंबईला परतले. त्यानंतर ते संध्याकाळी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. शहा यांच्या भेटीनंतर शेलार यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशीही चर्चा केल्याचे सांगितले जाते.

फडणवीस आणि शेलार या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि शहांच्या भेटीबाबत गुप्तता राखण्यात आल्यामुळे राज्यातील राजकारणाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. केंद्रात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी फडणवीस यांची अमित शहा तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी संभाव्य मंत्र्यांच्या समावेशाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर शुक्रवारी फडणवीस आणि शेलार यांनी शहा यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

फडणवीस आणि शेलार यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दिल्लीत येणार आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी चर्चा करणार आहेत. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख आणि खासदार रामदास आठवले यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. अमित शहादेखील खासदारांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत प्रामुख्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे समजते.

मुंबई पालिका निवडणूक लक्ष्य

भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी चर्चा करणार आहेत. अमित शहा हेही खासदारांना भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीला रामदास आठवले यांनाही बोलावण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis ashish shelar in delhi to meet amit shah zws