नवी दिल्ली : जपच्या वरिष्ठ नेत्यांमधील बैठकसत्रामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेने जोर धरला असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे.
ही बैठक प्रगती मैदानावर नव्याने उभारलेल्या सभागृहात होण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी येत्या सप्टेंबरमध्ये जी२० ची परिषद होणार आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजप-शिवसेना महायुतीसोबत आल्याने तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात खलबते सुरू असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांची चर्चा केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू मानले जाणारे प्रफुल पटेल हे महायुतीकडे वळल्याने त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची अटकळ बांधली जात आहे. त्याचबरोबर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्याने याच पदावरील देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. फेरबदलात भाजपच्या मित्रपक्षांनाही संधी मिळेल, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या दरम्यान हे फेरबदल संभवतात. २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवत काही राज्यांत भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वात बदल होण्याची शक्यताही आहे. मोदी यांनी २८ जून रोजी शहा आणि नड्डा यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केली होती.