scorecardresearch

“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य – ट्विटर)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना “मला माफ करा, मी हा शब्द वापरतो आहे,” असं वक्तव्य केलं. तसेच काँग्रेसला त्यांचा पराभव होताना दिसत असल्याचा आरोप केला. त्यांनी स्वतः गुरुवारी (१ नोव्हेंबर) याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मोदींना शिव्या दिल्या आहेत तेव्हा तेव्हा गुजरात आणि देशाच्या जनतेने मतांच्या माध्यमातून त्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. तसेच मागच्या पेक्षा अधिक मतं देत मोदींसोबत असल्याचं सांगितलं. तसेच अशा लोकांना त्यांची लायकी दाखवली आहे. माफ करा मी लायकी हा शब्द वापरला, पण कधी कधी हा शब्द वापरावा लागतो.”

“भाजपाचा मोठा विजय होईल”

“काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव या निवडणुकीत होईल आणि भाजपाचा मोठा विजय होईल,” असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

“…म्हणून काँग्रेस नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात.”

“मोदींविषयी अपशब्द काढून काँग्रेसने पराभव स्वीकारला”

“काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोदींविषयी अपशब्द काढून हे सिद्ध केलं की काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. त्यांच्याकडे मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही उत्तर नाही. त्यांच्याकडे नेताही नाही आणि नीतीही नाही. त्यामुळेच ते अशाप्रकारच्या भाषेपर्यंत घसरले आहेत,” असा आरोप देवेंद्र फडणीसांनी केला.

“मोदींनी ७०० वर्षांचा कलंक मिटवून रामललांच्या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू केलं”

फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यांनी प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारलं आणि खरंच रामाचा जन्म झाला होता का असा प्रश्न उपस्थित केला असे लोक ७०० वर्षांचा कलंक मिटवून रामललांच्या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू केलं त्यांना रावणाची उपमा देत आहेत.”

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

“रावणाचे सहकारी कोण आहेत?”

“मला विचारायचं आहे की, रावणाचे सहकारी कोण आहेत? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते रावणाचे साथी आहेत की, अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती करणारे मोदी?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. तसेच मोदींना रावण म्हणण्याचा दृष्टपणा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला असं म्हणत यावर केवळ आम्ही नाही, तर संपूर्ण देश त्यांचा निषेध करत आहे, असंही नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 12:40 IST

संबंधित बातम्या