DGCA direct Air India : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. १२ जून रोजी झालेल्या या भीषण अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA)ने एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकार्यांना क्रू ड्यूटी शेड्यूल आणि रोस्टरसंबंधीत जबाबदार्यांवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश १२ जून रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर देण्यात आला आहे. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
तसेच एअर इंडियाला असा इशाराही देण्यात आला आहे की, आगामी काळात तर क्रू शेड्यूलिंग नियम, लायसनिंग किंवा फ्लाइट टाईम मर्यादा यासंबंधी नियमांचे उल्लंघन करण्यात आले तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये दंड, परवाना रद्द करणे किंवा ऑपरेटर परवानग्या रद्द करणे यांचा समावेश असेल. म्हणजेच एकंदरीत जर अशा महत्त्वाच्या गोष्टींमध्ये चुका होत राहिल्या तर एअर इंडियाला टाळे लागू शकते असा गंभीर इशारा DGCAने दिला आहे.
इतकेच नाही तर डीजीसीएने एअरलाईनला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. एअर इंडियाला ठरवून दिलेल्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नुसार वैमानिकांना १० तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण करण्यास भाग पाडले आणि १६ आणि १७ मे रोजी बंगळुरू-लंडन या दोन उड्डाणे केली याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे
DGCAने आदेशात काय म्हटले आहे?
DGCAने त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, “एअर इंडियाला या तीन अधिकाऱ्यांच्या विरोधात तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी लागेल आणि त्याचा रिपोर्ट १० दिवसांच्या आत जमा करावा लागेल. याबरोबरच या अधिकार्यांना सध्या ऑपरेशनसंबंधी कामावरून हटवून नॉन-ऑपरेशनल भूमिकांवर नियुक्त केले जावे. जोपर्यंत शेड्यूलिंग संबंधी प्रक्रियेत आवश्यक सुधारणा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे अधिकारी फ्लाइट सुरक्षा किंवा क्रू संबंधी जबाबदारी असलेल्या पदावर राहाणार नाहीत.
DGCAने एअर इंडियामध्ये कार्यरत असलेले चूरा सिंह (डिव्हिजनल उपाध्यक्ष), पिंकी मित्तल (मुख्य व्यवस्थापक- ओपरेशन डायरेक्टोरेट) आणि पायल अरोडा (क्रू शेड्यूलिंग- प्लॅनिंग) या पदावर कार्यरत होते.
१२ जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच कोसळले होते. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले होते. या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तर अवघा एक व्यक्ती बचावला होता. याशिवाय बीजे मेडिकल कॉलेजमधील २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.