नवी दिल्ली : ‘स्पाईसजेट एअरलाइन्स’ या विमान कंपनीची निम्मी उड्डाणे पुढील आठ आठवडे म्हणजे सुमारे दोन महिन्यांसाठी कमी केल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी जाहीर केले. या विमान कंपनीच्या विमानांत गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेगवेगळे बिघाड घडत असल्याने महासंचालनालयाने ही अंतरिम कारवाई केली. यासंदर्भातील विमान नियम १९३७ अंतर्गत ‘१९ अ’ अनुसार ही कारवाई करण्यात आली.
‘स्पाईसजेट’ उड्डाणांची संख्या ही आदेश प्रसृत केल्यापासून आठ आठवडय़ांसाठी लागू असेल. कंपनी २०२२ च्या उन्हाळी हंगामासाठी मंजूर केलेल्या निर्गमनांच्या संख्येच्या ५० टक्केच उड्डाणे करू शकेल. ‘स्पाइसजेट एअरलाइन्स’च्या विमानांत १८ दिवसांत किमान आठ तांत्रिक बिघाडाच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या. यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सोमवारी सांगितले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला ‘स्पाइसजेट’च्या विमानांच्या तपासणीदरम्यान सुरक्षेचे कोणतेही गंभीर उल्लंघन आढळले नाही. ९ ते १३ जुलैदरम्यान, ‘स्पाईसजेट’च्या ४८ विमानांत असे बिघाड आढळल्याचे समजल्यावर ५३ तपासण्या केल्या गेल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले की सुरक्षेचा उपाय म्हणून, ‘डीजीसीए’ने ‘स्पाईसजेट’ने सर्व दोष दुरुस्त केल्याची ‘डीजीसीए’ची पुष्टी झाल्यानंतरच खात्रीलायक सुरक्षित विमान वापरण्याचे आदेश ‘स्पाईसजेट’ला दिले आहेत. ‘डीजीसीए’चे हे आदेश खराब अंतर्गत सुरक्षा निरीक्षण आणि अपुऱ्या देखभालीमुळे देण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीच्या विमानांच्या सुरक्षिततेचा दर्जा खालावल्याचे सिंह यांनी नमूद केले.
घटनांची चौकशी
‘डीजीसीए’ने १ एप्रिल ते ५जुलै या कालावधीत‘ स्पाइसजेट’च्या विमानांबाबतच्या घटनांची चौकशी केली. अनेक प्रसंगी, विमान एक तर त्याच्या मूळ स्थानकावर परतले किंवा सुरक्षिततेशी तडजोड करत या विमानांनी गंतव्य स्थानावर उतरण्यावर भर दिला. ‘डीजीसीए’च्या अंतरिम आदेशात नमूद केले, की स्पाईसजेट कंपनी असे प्रकार भविष्यात घडणार नाही, याबाबत सर्वतोपरी उपाय करत आहे. या कंपनीला सुरक्षित आणि विश्वासार्ह हवाई वाहतुकीसाठी सतत कटिबद्ध राहण्याची गरज आहे.