भारत-पाक सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये मंगळवारी फोनवरुन संध्याकाळी तातडीची महत्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत दोन्हींकडील सैन्याद्वारे २००३ च्या शस्त्रसंधी सहमती कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे यापुढे सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही तसेच यात आपले जवान शहीद होणार नाहीत अशी आशा आहे.


जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी रेंजर्सकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर सीमाभागात राहणाऱ्या अनेक निरपराध नागरिकांचेही यात जीव गेले आहेत. तसेच अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यांना भारतीय जवानांनीही वेळोवेळी सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओंशी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता हॉटलाइनवरुन संपर्क साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन्ही पक्षांकडून झालेल्या चर्चेदरम्यान, सीमेवर दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवण्यात येऊन सध्याचे तणावपूर्ण वातावरण बदलावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबाबत एकमत झाले. त्याचबरोबर दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान २००३मध्ये झालेल्या शस्त्रसंधीबाबत सहमती करार लागू करण्यावरही सहमती झाली. तसेच जर कोणत्याही कारणास्तव सीमेवरील स्थिती बिघडली तरी सीमेवरील वातावरण खराब होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी हॉटलाइनवरुन एकमेकांशी संपर्क करुन अथवा स्थानिक पातळीवर कमांडर स्तरावरील फ्लॅग मिटींगद्वारे त्यावर तोडगा काढण्यात यावा असे निश्चित झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण ऱेषेवर पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सीमेपलिकडून झालेल्या ७०० पेक्षा अधिक गोळीबाराच्या घटनांमध्ये १८ जवानांसह ४० सामान्य नागरिक मारले गेले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत.