भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांची पुस्तकामध्ये टिपण्णी
विकसित देशातील आर्थिक विकासाची मंदगती अजून कायम आहे. ती हळूहळू पूर्वपदावर आणणे हाच खरा उपाय आहे, तशी ती येतही आहे, असे असले तरी १९९२-२००७ दरम्यानचा आर्थिक विकासाचा उच्च दर नजीकच्या काळात तरी या देशांना साध्य करता येणार नाही. असे एका नवीन पुस्तकात म्हटले आहे.
‘ह्य़ुब्रीस – व्हाय इकॉनॉमिस्ट्स फेल्ड टू प्रेडिक्ट द क्रायसिस अँड हाऊ टू अ‍ॅव्हॉइड द नेक्स्ट वन’ या पुस्तकात मेघनाद देसाई यांनी म्हटले आहे, की सध्याची स्थिती पाहता आर्थिक विकासाची गती मंद असेल पण किमती चढत्या राहणार नाहीत तर पडत जातील. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे मानद प्राध्यापक असलेल्या देसाई यांनी म्हटल्यानुसार युरोझोनमध्ये चलनवाढ कमी होत आहे व आर्थिक वाढ कुंठित झाली आहे. चीनमधील आर्थिक वाढीचा दर कमी होत आहे. अमेरिका, ब्रिटन यांसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांचे विकासाचे दर पुन्हा १९९२-२००७ दरम्यान जे होते तितके जास्त होऊ शकणार नाहीत.
२००७ च्या मध्यावधीत काही घटना लागोपाठ घडल्या व २००६ मध्ये अमेरिकेत गृहनिर्माण क्षेत्राचा बुडबुडा फुटला, त्यानंतर फेब्रुवारी २००७ मध्ये शांघायचा शेअर बाजार कोसळला होता. ही परिस्थिती पहिल्या महायुद्धाच्या वेळी होती तशी आहे, काही देशांना सैन्य चार महिन्यांत माघारी येईल असे वाटत होते, अर्थतज्ज्ञांना त्या वेळचा आर्थिक पेच तात्पुरता वाटत होता, काहींना त्यातून आपोआप मार्ग निघेल असे वाटले पण तो आर्थिक पेच गंभीर आहे व तो सोडवण्याचे मार्ग आहेत असे काहींनी सांगितले होते.
२००८ मधील महामंदी १९३० नंतरचा सर्वात मोठा पेच होता, त्याचे परिणाम पाच वर्षे होत राहिले. आताही अर्थव्यवस्था पुन्हा सुधारण्याच्या मार्गावर येत आहेत पण आर्थिक घटक पुन्हा योग्य स्थितीत येण्यास काही वर्षे लागतील.
नकाराचे म्हणून एक तत्त्वज्ञान
२००८ च्या आर्थिक पेचप्रसंगाच्या वेळी राणी एलिझाबेथ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यास गेल्या असताना त्यांनी तुम्हाला या आर्थिक पेचप्रसंगाचा अंदाज आला नाही का, अशी विचारणा केली नंतर काही अर्थतज्ज्ञांनी राणीला पत्र पाठवून सांगितले, की अनेक बुद्धिमान लोकांच्या सामूहिक कल्पनाशक्तीला या पेचाने चकवा दिला. नकाराचे म्हणून एक तत्त्वज्ञान असते, पण राणी एलिझाबेथ यांना उत्तर पटले नाही.
नोरिएल रॉबिनी यांचा दावा
त्यानंतर नोरिएल रॉबिनी यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांनी हा पेचप्रसंग होणार असल्याचे आधीच सांगितले होते असा दावा केला. सर्पिलाकार चक्रातून अर्थव्यवस्थेचे मार्गक्रमण..
२००५ मध्ये रिझर्व बँकेचे आताचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अर्थशास्त्रज्ञ असताना आर्थिक पेच प्रसंगाचे भाकीत केले होते, आर्थिक बाजारपेठातील काही घटक अस्थिर होतील व जोखीम वाढेल, असे त्यांनी सांगितले होते. राणी एलिझाबेथ यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ आता जसा विचार करतात, तसा तो का करतात व त्यामुळे भाकिते का करता येत नाहीत, याचा उलगडा करणे आवश्यक आहे. अर्थशास्त्रात दोन मतप्रवाह आहेत एक म्हणजे अर्थव्यवस्थेत नेहमीच समतोल असतो व त्यात कधीच मोठा तोटा होऊ शकत नाही, दुसरा मतप्रवाह म्हणजे असमतोल येऊ शकतो व त्यामुळे कधी मंदी तर कधी तेजी असे चक्र असते. पण आताचा पेच हा केवळ असमतोल म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, त्याचे महत्त्व समजून घ्यावे लागेल, काय घडले आहे व काय पुन्हा घडू शकते हे पाहिले पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्था १८७३ ते ९६ या काळात एका मोठय़ा चक्रातून गेली, ते वर्तुळ नव्हते तर सर्पिलाकार चक्र होते, आताही जागतिक अर्थव्यवस्था अशाच एका चक्रातून जात असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult to achieve economic growth to develop country
First published on: 07-09-2015 at 01:57 IST