काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू असल्याच्या चर्चा होत असताना काँग्रेसचे सरचिटणीस  दिग्विजय सिंह यांनी सावध भूमिका घेत संसदीय व्यवस्थेमध्ये संसद आणि विधिमंडळातील सदस्य आपला नेता (पंतप्रधान) निवडतात असे म्हटले.
दिग्विजय सिंह म्हणाले की, “मी याआधीपासूनच सांगत आलो आहे की, आपल्याकडे संसदीय लोकशाही व्यवस्था आहे आणि येथे दोन प्रमुख व्यक्तींमध्ये निवडणूक होत नाही. ही राजकीय लढाई पक्षाची धोरणे, विचारसरणी यांमधील आहे. लोकशाही पद्धतीत जो पक्ष बहुमताने निवडून येईल. त्यांच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून नेता निवडला जातो. मग तो पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री असेही दिग्विजय म्हणाले.
पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणूकीआधीच जाहीर करणे म्हणजे लोकशाही पद्धतीत निवडून येणाऱया सदस्यांच्या मतावर घाला आणण्यासारखे आहे. पंतप्रधान निवडणे  हा निवडणूकीत निवडून येणाऱया लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणूकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची पद्धत नाही. असेही दिग्विजय पुढे म्हणाले. परंतु, याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी योग्य वेळ पाहून उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे म्हटल्यावर यावेळी काँग्रेसही निवडणूकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदावार जाहीर करण्याची शक्यता वाढली. तसेच सोनियांच्या या वक्तव्याने काँग्रेस नेतेही भारवून गेले होते.