ट्रॅजेडी किंग म्हणून नावाजल्या गेलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयातून स्वतःची छाप उमटवली. निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांची अशीच एक आठवण आहे कारगिल युद्धादरम्यानची. दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना युद्धावरून खडेबोल सुनावले होते.

गोष्ट आहे १९९९ ची! भारत-पाकिस्तान यांच्यात कारगिलमध्ये युद्ध संघर्ष सुरू होता. त्यावेळी भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफांना फोन केला होता. पंतप्रधान नवाज शरीफ यांना एडीसी अधिकाऱ्याने (स्वीय सहाय्यक) सांगितलं की, “भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोन आहे आणि त्यांना आपल्याशी तातडने बोलायचं आहे.” त्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी फोन घेतला. त्यावेळी वाजपेयी त्यांना म्हणाले, “एकीकडे लाहोरमध्ये तुम्ही माझं जल्लोषात स्वागत करत होतात, तर दुसरीकडे तुमचं सैन्य आमच्या भूभागावर ताबा मिळवत होतं.”

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वाजपेयींनी हे शरीफांच्या कानावर घातल्यानंतर शरीफ म्हणाले, “आपण जे म्हणत आहात, त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. मला थोडा वेळ द्या, मी सैनाध्यक्ष जनरल परवेझ मुशरफ यांच्याशी बोलून तत्काळ तुम्हाला फोन करतो.” त्यानंतर फोनवरील संवाद संपण्याच्या बेतात असतानाच वाजपेयी नवाज शरीफांना म्हणाले, “माझी इच्छा आहे की आपण माझ्या शेजारी बसलेल्या व आपल्या दोघांचं बोलण ऐकत असलेल्या व्यक्तीशी बोलावं.”

त्यानंतर शरीफांच्या कानावर दिलीप कुमार यांचा आवाज पडला. दिलीप कुमार शरीफांना म्हणाले,” साहेब, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, जेव्हा केव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण होतो; तेव्हा भारतीय मुस्लिमांची मनस्थिती खूप गुंतागुंतीची होऊन जाते. इतकंच नाही तर त्यांना आपल्या घरातून बाहेर पडायलाही समस्या निर्माण होतात. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी करा,” असं दिलीप कुमार यांनी शरीफांना सांगितलं. त्यानंतर कारगिलमधील युद्ध संघर्ष हळूहळू कमी होत गेला, असा हा किस्सा आहे.

हा किस्सा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद महेमूद कसूरी यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेला आहे. ‘नीदर अ हॉक नॉर अ डव’ असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे.