राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा विराजमान होणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी दीया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची निवड झाली आहे. दीया कुमारी यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्येही आघाडीवर होतं. मात्र निर्णयावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. राजस्थान सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर दीया कुमारी यांनी वसुंधरा राजेंबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दीया कुमारी यांनी हे पद दिल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे तसंच राजस्थानच्या प्रभारींचे आभार मानले आहेत. वसुंधरा राजे आणि तुमच्यात शीतयुद्ध आहे का? त्यांची नाराजी समोर आली आहे का? असा प्रश्न दीया कुमारी यांना विचारण्यात आलं त्यावर दीया कुमारी यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या दीया कुमारी?

“मी याबाबत कुठलंही भाष्य करणार नाही. कारण जे तुम्ही विचारत आहात असं काहीही नाही. जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडले जात होते तेव्हा वसुंधराराजेही तिथेच होत्या. त्यांनी मला आशीर्वाद दिला. ” असं दीया कुमारी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा एक दलित कुटुंबातून तर एक राजघराण्यातून.. जाणून घ्या कोण आहेत राजस्थानचे दोन उपमुख्यमंत्री?

आणखी काय म्हणाल्या दीया कुमारी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिलांच्या प्रश्नांची चिंता आहे. त्यामुळे देशातल्याही अनेक योजना महिलांना प्राधान्य देऊन योजण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा, त्यांच्याविषयचे कायदे कठोर करणं ही आपली प्राथमिकता असेल. तसंच मला जी जबाबदारी दिली आहे ती मी पूर्ण निष्ठेने निभावेन असं दीया कुमारी यांनी म्हटलं आहे.