पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएनएबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार चांगलेच संतप्त झाले असून, त्यांनी सोमवारी ‘वक्तव्य मागे घ्या’ मोहीम सुरू केली. मोदी यांच्या वक्तव्याने बिहारच्या जनतेचा अपमान झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
बिहारमधील जद(यू)-राजदची आघाडी राजकीय संधिसाधूपणा असल्याची टीका मोदी यांनी केल्यानंतर नितीशकुमार यांनी ट्विटरवरून ‘शब्द वापसी’ मोहीम हाती घेतली आहे. जवळपास ५० लाख जण मोदी यांच्याकडे डीएनए चाचणीचे नमुने पाठविणार आहेत.मोदी यांनी डीएनए वक्तव्य मागे घ्यावे यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा एक भाग म्हणून राज्यात चार-पाच स्वाभिमान मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. डीएनए वक्तव्यावरून जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असेही ते म्हणाले. पहिला मेळावा २९ ऑगस्ट रोजी पाटणा येथे होणार आहे.
मुझफ्फरपूर येथील भाजपच्या परिवर्तन मेळाव्यात २५ जुलै रोजी मोदी यांनी नितीशकुमार यांच्याविरुद्ध डीएनए वक्तव्य केले होते. सातत्याने विनंती करूनही मोदी यांनी वक्तव्य मागे न घेतल्याने मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकशाहीत जनता सर्वोच्च असल्याने आता जनताच निर्णय घेईल, असेही नितीशकुमार म्हणाले. सप्टेंबर महिन्यांत ५० लाख जण मोदी यांच्याकडे डीएनए चाचणीचे नमुने स्वाक्षऱ्यांसह पाठविणार आहेत.
स्नेहभोजन सुशील मोदींच्या ‘सल्ल्या’ने रद्द; मंत्र्यांचा गौप्यस्फोट
भाजपच्या नेत्यांच्या सन्मानार्थ २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या ‘सल्ल्या’नेच रद्द करण्यात आल्याचा गौप्यस्फोट सोमवारी बिहारचे अन्नमंत्री श्याम रजक यांनी केला. नितीशकुमार यांना दुखावण्यासाठीच सुशील मोदी यांच्या सल्ल्याने भाजपच्या नेत्यांसाठी आयोजित केलेला स्नेहभोजनाचा कायक्रम रद्द करण्यात आला, असे रजक म्हणाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्तारूढ जद(यू) आणि भाजपमधील संघर्ष अधिकाधिक उफाळून येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्नेहभोजनाचा कार्यक्रम रद्द केल्यानंतर मागविण्यात आलेले भोजन एका आलिशान हॉटेलमध्ये पाठविण्यात आले आणि तेथे जाऊन भाजपच्या नेत्यांनी भोजन केले, असा दावा रजक यांनी केला आहे. बिहारमध्ये एनडीएच्या काळात सुशील मोदी उपमुख्यमंत्री होते.
नितीशकुमारांवर भाजपची टीका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना काही गुन्हेगारी प्रकरणांत कारावास भोगावा लागल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेले वक्तव्य भाजपला झोंबले आहे. शहा यांना यूपीए सरकारने गोवले होते आणि त्यांची आता सर्व प्रकरणांमधून सुटका झाली आहे, असे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे. कारागृहातच एखादा माणूस वाईट गोष्टी शिकतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गया येथील सभेत केले होते. गुन्हेगारी प्रकरणात कारागृहात असताना शहा यांनी सर्व वाईट गोष्टी शिकल्या, असे वक्तव्य नितीशकुमार यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन केले होते.
शब्दवापसी के इस महाअभियान में कम से कम 50लाख बिहार के लोग हस्ताक्षर अभियान से जुड़ेंगे और DNA टेस्ट्स के लिए अपना सैंपल भी मोदीजी को भेजेंगे
— Nitish Kumar (@NitishKumar) August 10, 2015