आपल्या मार्मिक आणि उपहासगर्भ लेखनाने जगाला वेडं करणाऱ्या जॉर्ज ऑरवेल यांच्या कर्तृत्वाची दखल भारतात, खुद्द त्यांच्या जन्मस्थळीच घेतली जात नव्हती. याची सल मनात असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने ऑरवेल यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा परिचय करून देणारा माहितीपटच तयार केला आहे. मंगळवारी त्या माहितीपटाचे मोतीहारी येथील महाविद्यालयामध्ये प्रसारण करण्यात आले.
‘बिहारमधील चंपारण्य जिल्ह्य़ातील मोतीहारी येथे १९०३ साली जॉर्ज यांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव एरिक ऑर्थर ब्लेयर असे होते. साम्यवादातील गंभीर दोषांवर अचूक आणि मार्मिकपणे बोट ठेवणाऱ्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ तसेच १९८४ या त्यांच्या कादंबऱ्या चांगल्याच गाजल्या होत्या. मात्र असे असूनही जेथे त्यांचा जन्म झाला, त्या भारतात त्यांच्या कर्तृत्वाबद्दल फारशी जाणीव नाही, ही परिस्थिती बदलण्याच्या भूमिकेतून आपण ‘ऑरवेल, बट व्हाय’ हा माहितीपट तयार केला’ असे दिग्दर्शक बिश्वजीत मुखर्जी यांनी सांगितले.
२१ जानेवारी, १९५० रोजी लंडन मुक्कामी ऑरवेल यांचे निधन झाले होते. त्यांच्या ६४ व्या स्मृतिदिनी मोतीहारी येथील एका महाविद्यालयात सदर माहितीपट दाखविण्यात आला. हा माहितीपट, म्हणजे ऑरवेल यांच्या जीवनाचा चरित्रपट नसून त्यांच्या विचारधारेचा, येथे दुर्लक्षिल्या गेलेल्या त्यांच्या वारशाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुखर्जी यांनी दिली.
ऑरवेल यांच्या लेखनाची वैशिष्टय़े
ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय इंपिरियल पोलीस’ खात्यात काम करत असताना ऑरवेल यांना म्यानमारमध्ये पाठविण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी लिहिलेल्या ‘बर्मिज डेज्’ या कादंबरीत साम्राज्यवादविरोधी भूमिका घेतली होती. भारतावर, येथील खाद्यसंस्कृतीवर त्यांचे जिवापाड प्रेम होते.
गांधीजींपेक्षा इंग्रज महत्त्वाचा?
ज्या चंपारण्यात १९१७ साली महात्मा गांधी यांनी आपला पहिला सत्याग्रह केला, त्याच चंपारण्यात जन्मलेल्या एका इंग्रज व्यक्तीवर माहितीपट तयार करण्याची गरज होती का, गांधीजींच्या जीवनावर माहितीपट काढावा असे वाटले नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती २३ वर्षीय बिश्वजीत मुखर्जी यांच्यावर केली जाते. मात्र, नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर माहितीपटात दिले असल्याचे मुखर्जी सांगतात.
जन्मशताब्दीपर्यंत दुर्लक्षित
ऑरवेल यांचे जन्मस्थान बिहारमधील मोतीहारी येथे आहे, हे १९८३ साली एका स्कॉटलंडमधील पत्रकाराने शोधून काढले.  २००३ हे ऑरवेल यांचे जन्मशताब्दी वर्ष, त्या वर्षी जगभरातील पत्रकारांची, लेखकांची मोतीहारी येथे रीघ लागली होती. मात्र त्यांचे घर आणि त्यांचे गोदाम या दोन्ही वास्तू अनेक वर्ष दुर्लक्षितच राहिल्या.
इंग्रज लेखकाची शोकांतिका
ऑरवेल यांच्या बिहारमधील मूळ घरात इंग्रजी साहित्य शिकविणारे ब्रिटिश शिक्षक राहत होते. शेक्स पियर, मार्क ट्वेन शिकविणाऱ्या या शिक्षकांनाही आपण कोणाच्या घरात राहतो आहोत, याची माहिती नव्हती, ही जगप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.