Indias Russian Oil Purchase And US Tariff: व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी युक्रेन संघर्षाचा “मोदींचे युद्ध” असा उल्लेख केला आहे. त्यांनी दावा केला की, भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने रशियाच्या आक्रमकतेला चालना मिळाली आहे आणि अमेरिकन करदात्यांवर त्याचा भार पडला आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर त्यांच्यावरील २५ टक्के टॅरिफ लगेचच कमी होऊ शकते.

ब्लूमबर्ग टेलिव्हिजनच्या बॅलन्स ऑफ पॉवरला दिलेल्या मुलाखतीत, व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी रशिया-युक्रेन संघर्षाचा उल्लेख करत म्हटले की, “शांततेचा मार्ग अंशतः नवी दिल्लीतून जातो”.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादला आहे, जो कालपासून (२७ ऑगस्ट) लागू झाला आहे. पाश्चात्य दबावाला न जुमानता भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारताला दंड म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्यात आले आहे.

…तर उद्याच टॅरिफमधून सुटका

अमेरिका भारताशी चर्चा करत आहे का आणि टॅरिफ कमी होण्याची काही शक्यता आहे का? असे विचारले असता, व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी उत्तर दिले, “हे खरोखर सोपे आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले आणि युद्ध यंत्राला पोसण्यास मदत केली तर उद्याच त्यांना टॅरिफमधून २५ टक्के सूट मिळू शकते.”

नवारो पुढे असेही म्हणाले की, “मी गोंधळलो आहे. कारण मोदी एक महान नेते आहेत. ही एक परिपक्व लोकशाही आहे जिथे परिपक्व लोक ती चालवतात.”

ते खूप उद्धटपणे वागत आहेत

नावोरो भारताच्या टॅरिफबाबतच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले, “माझ्यासाठी त्रासदायक बाब म्हणजे भारतीय या बाबतीत खूप उद्धटपणे वागत आहेत. ते म्हणत आहेत की, “आम्ही कुठे जास्त टॅरिफ आकारतो? हे आमचे सार्वभौमत्व आहे. आम्ही ज्याच्याकडून हवं त्याच्याकडून तेल खरेदी करू शकतो.”

रशियन युद्धयंत्रणेला भारताचे बळ

नवारो यांनी भारतावर रशियाच्या युद्ध यंत्रणेला आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. “भारत रशियन तेल सवलतीत खरेदी करतो आणि रशिया यातून आपल्या युद्धयंत्रणेला बळ देऊन युक्रेनियन लोकांना मारतो”, असे ते म्हणाले.

Live Updates