Donald Trump AI-Generated Video: ‘एआय’ जसे विकसित होत आहे, तसे आपल्याला अनेक सुविधा मिळत आहेत. पण काही लोक एआयचा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्याद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एआयने तयार केलेला व्हिडीओ वापरून कर्नाटकमधील काही शहरांमध्ये अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २०० हून अधिक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू, तुमकुरू, मंगळुरू आणि हवेरी याठिकाणी सायबर चोरी झाल्याची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. एकट्या हवेरीमध्ये १५ हून अधिक लोकांनी आपले पैसे गमावले आहेत.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सायबर चोरट्यांनी पीडितांना गुंतवणुकीची संधी, घरून काम करण्याचा पर्याय आणि उच्च परतावा मिळवण्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी पीडितांकडून आधी नोंदणी करण्यासाठी १,५०० रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कंपनी प्रोफाईल तयार करण्यासारखी कामे दिली. जसे जसे टास्क पूर्ण झाले, त्याप्रमाणे पीडितांच्या डॅशबोर्डवर पैसे जमा झाल्याचे दिसत होते. मात्र हे पैसे फक्त त्या ॲपवरच दिसत होते.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना २८ वर्षीय वकिलाने सांगितले की, त्याने २५ जानेवारी ते २ एप्रिल दरम्यान ५,९३,२४० रुपये गुंतवले. जानेवारी महिन्यात मला यूट्यूब शॉर्ट्सवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करण्यासंबंधीचा व्हिडीओ दिसला. संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर मला एक मोबाइल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तिथे एक अर्ज भरण्यास सांगितला गेला, जो मी भरला. तसेच पुढे बँक खात्याची माहिती आणि आयएफएससी कोडही टाकला.

त्यानंतर नोंदणी शुल्क म्हणून १,५०० रुपये भरल्यानंतर माझ्या प्रोफाइलमध्ये ३० रुपये जमा झाले. माझ्या प्रोफाइलमध्ये दररोज ३० रुपये जमा होत होते आणि ३०० रुपये झाल्यानंतर मला ते काढता येणार होते. मला वेळेवर पैसे मिळू लागल्यानंतर मला पलीकडून आणखी पैसे गुंतविण्यास सांगण्यात आले. ५,००० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीचे पर्याय होते. शेवटी माझे पैसे काढण्यासाठी त्यांनी उत्पन्नावर कर भरण्यास सांगितले. पण तरीही मला गुंतवलेली रक्कम काढता आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला एक लाख रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी भाग पाडले. मी तेवढी गुंतवणूक केल्यानंतर २४ तासांत मला एक लाख परत मिळालेही. पण त्यानंतर गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही. माझ्या माहितीत अनेक पोलीस, सरकारी अधिकारी आणि व्यापारी आहेत, ज्यांनी या बोगस योजनेत आपले पैसे गमावले आहेत, असेही पीडित वकिलाने सांगितले.