Donald Trump On Tariff : गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारताच्या व्यापार धोरणांवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. यावेळी ट्रम्प यांनी नवी दिल्लीने अमेरिकेवर जगातील सर्वात जास्त टॅरिफ लादल्याचा आरोप केला. याबरोबरच दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून असलेले आर्थिक संबंध हे एकतर्फी असल्याचेही ट्रम्प यावेळी म्हणाले आहेत.

ओव्हल कार्यालयातून बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आपले भारताबरोबर खूप चांगले संबंध आहेत, पण अनेक वर्ष हे एकतर्फी नाते राहिले. फक्त आता मी आल्यापासून आणि आपल्याकडे असलेल्या शक्तीमुळे, भारत आपल्यावर प्रचंड टॅरिफ लादत होता. जवळपास जगातील सर्वाधिक, आणि त्यामुळेच आपण भारताभारताबरोबर फारसा व्यापार करत नव्हतो, पण भारत मात्र आपल्याबरोबर व्यापार करत होता. कारण आपण मूर्खासारखे त्यांच्याकडून टॅरिफ आकारत नव्हतो. आपण त्यांच्यावर टॅरिफ लावत नव्हतो.”

“त्यामुळेच ते त्यांनी बनवलेल्या सर्वकाही वस्तू मोठ्या प्रमाणात आपल्या देशात पाठवत होते. म्हणून त्या वस्तू इथे बनवल्या जात नव्हत्या, जी नकारात्मक गोष्ट आहे. पण आपण काहीच पाठवत नव्हतो कारण ते आपल्यावर १०० टक्के टॅरिफ लादत होते,” असेही ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले.

यावेळी ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन दुचाकीचे उदाहरण देखील दिली. अमेरिकेतील सर्वाधिक ओळखला जाणारा मोटारसायकल ब्रँड हार्ले-डेव्हिडसनला भारतात व्यवसाय करताना आलेल्या अडचणीबद्दल त्यांनी माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, “हार्ले-डेव्हिडसन भारतात विक्री करू शकत नव्हते. तेथे मोटारसायकलवर २०० टक्के टॅरिफ होता. त्यामुळे काय झालं? हार्ले-डेव्हिडसन भारतात गेली आणि तेथे मोटारसायकल प्लांट उभारला. आता त्यांना टॅरिफ द्यावा लागत नाही.”

ट्रम्प यांनी असाही दावा केला की अन्यायकारक टॅरिफ रचनेमुळे कंपन्या अमेरिकेच्या बाहेर उत्पादन करावे लागत आहे, तसेच त्यांनी यु्क्तीवाद केला की त्यांच्या प्रशासनाच्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावणे अशा व्यापार धोरणामुळे हा ट्रेंड बदलत आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर प्रचंड शुल्क लादले आहे. अमेरिकेने भारतीय निर्यातीवर सुरूवातीला २५ टक्के शुल्क लादले आणि त्यानंतर भारत अमेरिकेकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावर आणखी अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादले. यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लादण्यात आले आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध गेल्या काही दिवसांपासून कमालीचे ताणले गेले आहेत.