Sergio Gor US ambassador to India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळातील पदभार स्वीकारल्यानंतर सात महिन्यांनी ३८ वर्षीय सर्जियो गोर यांना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला असताना ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सर्जियो गोर यांच्यावर जहरी टीका केली होती. ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर गोर आणि मस्क हे प्रशासनातील महत्त्वाचे लोक होते.

ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, “माझे सहकारी सर्जियो गोर यांना भारतातील आमचे पुढचे युनायटेड स्टेट्स राजदूत आणि दक्षिण व मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणून पदोन्नती देत असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. प्रेसिडेन्शियल पर्सनल विभागाचे संचालक म्हणून सर्जियो आणि त्यांच्या टीमने रेकॉर्ड वेळेत आमच्या संघीय सरकारच्या प्रत्येक विभागात सुमारे ४,००० अमेरिकन देशभक्तांना नियुक्त केले. आता आमच्या सरकारचे विभाग आणि एजन्सीत ९५ टक्के मनुष्यबळ कार्यरत आहे. व्हाईट हाऊसकडून पुष्टी मिळेपर्यंत सर्जियो सध्याच्या पदावर कायम राहतील.”

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “सर्जियो माझा चांगला मित्र असून तो अनेक वर्षांपासून माझ्याबरोबर आहे. त्याने माझ्या ऐतिहासिक अशा राष्ट्राध्यक्षपदाच्या मोहिमेत काम केले, माझी सर्वाधिक विक्री होणारी पुस्तके प्रकाशित केली आणि आमच्या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या सर्वात मोठ्या पीएसींपैकी (पॉलिटिकल ॲक्शन कमिटी) एक त्याने चालवली.”

एलॉन मस्क यांनी केली होती टीका

मे महिन्यात टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून बाजूला होत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जून महिन्यात एलॉन मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी सर्जियो गोर यांना ‘साप’ म्हटले होते.

न्यूयॉर्क पोस्टने सर्जियो गोर यांच्याबाबत एक बातमी दिली होती. जो व्यक्ती अमेरिकेच्या विविध विभागांमध्ये हजारो पदांची भरती करत आहे, त्यांनी स्वतःचीच माहिती पुरवली नसून आवश्यक कागदपत्रे दिलेली नाहीत. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना एलॉन मस्क यांनी गोर यांना सापाची उपमा दिली होती.

एलॉन मस्क विरुद्ध सर्जियो गोर

मस्क आणि गोर यांच्यात अनेकदा वाद झाल्याबद्दल अमेरिकन माध्यमांत बातम्या आल्या होत्या. एका कॅबिनेट बैठकीत मस्क आणि गोर भिडले होते, असे वृत्त द हिलने दिले होते.

मस्क यांचे सहकारी जेरेड आयझॅकमन यांची नासामध्ये नियुक्ती करण्यासाठी मस्क यांनी प्रयत्न केले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नामांकन रद्द झाले. सर्जियो गोर यांनी अखेरच्या क्षणी डोनाल्ड ट्रम्प यांना आयझॅकमनबद्दल भूतकाळातील माहितीचे दस्तऐवज दिले. ज्यात त्यांनी डेमोक्रॅट्सना देणगी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रम्प यांचा संताप उफाळून आला.