Donald Trump On Tarrif : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. तसेच भारताकडून दंड वसूल करण्याबाबत धमकीवजा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.

त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी आज (६ ऑगस्ट) केली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मु्द्यांवरून ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत. यावरून मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील आयातशुल्क मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार असल्याचा इशारा देखील दिला होता. त्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांनी बुधवारी मोठी घोषणा करत २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली.

तसेच आजपासून २१ दिवसांनी म्हणजे २७ ऑगस्ट रोजी हे अतिरिक्त आयातशुल्क लागू होणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या निर्णयावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं सुरू ठेवल्याच्या मुद्यांवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला होता?

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इशारा दिला होता की, “भारत हा एक चांगला व्यापारी भागीदार नाही. भारत आमच्याबरोबर व्यापार करतो. मात्र, अमेरिका भारताबरोबर व्यापार करत नाही. भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता मला वाटतं की, पुढील २४ तासांत भारतावर आणखी जास्त टॅरिफ आकारावं लागेल. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, म्हणजेच युद्ध यंत्रणेला इंधन देत आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान, त्यानंतर २४ तासांत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली.