Donald Trump Benjamin Netanyahu Gaza Talks : गाझामध्ये चालू असलेलं युद्ध समाप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पाहायला मिळत आहे. याविषयी ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली. या चर्चेवेळी ट्रम्प नेतान्याहू यांना म्हणाले की “तुम्ही तुमची नकारात्मक वृत्ती सोडून द्या.” ट्रम्प प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, “गाझामध्ये चालू असलेलं विध्वंसकारी युद्ध समाप्त होण्याच्या वाटेवर आहे. हमास व तेल अवीव शांतता करार करण्यावर जवळपास एकमत झालं आहे.”

हमासने शांतता प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्याशी फोनवरून बातचीत केली आणि सांगितलं की शांतता कराराच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलं आहे. Axios च्या अहवालानुसार या सगळ्या प्रकरणावर नेतान्याहू यांचं मत वेगळं होतं.

ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात काय बातचीत झाली?

नेतान्याहू ट्रम्प यांना म्हणाले की “या संपूर्ण घटनाक्रमात जल्लोष करण्यासारखं काही नाही. खरंतर या सगळ्याला काहीच अर्थ नाही. यावर ट्रम्प यांनी दिलेली प्रतिक्रिया एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने Axios ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ट्रम्प नेतान्याहू यांना म्हणाले, “मला समजत नाही की तुम्ही नेहमीच इतके नकारात्मक का असता, नकारात्मक वृत्ती सोडा, हे सगळं स्वीकारा आणि पुढे जा. हा सुद्धा एक विजयच आहे.

नेतान्याहू काय म्हणाले?

या अधिकाऱ्याने सांगितलं की दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या या खासगी चर्चेवेळी इस्रायलचे प्रमुख ट्रम्प यांना म्हणाले, “वॉशिंग्टनच्या योजनेवर हमासने दिलेली प्रतिक्रिया एकप्रकारे शांतता प्रस्ताव नाकारल्यासारखंच आहे.”

नेतान्याहू यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी लगेच एक निवेदन जाहीर केलं. याद्वारे त्यांनी इस्रायलला गाझामधील त्यांचे हल्ले रोखण्यास सांगितलं. त्यानंतर काही तासांनी नेत्यान्याहू यांनी हल्ले रोखण्यासंदर्भात आदेश जाहीर केले. त्यामुळे हमासने तह केला तर ट्रम्प हे नेतान्याहू यांना युद्ध समाप्तीसाठी पावलं उचलायला सांगतील.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही गाझामध्ये शांतता करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. पुढील काही दिवसांत याला अंतिम स्वरुप प्राप्त होईल. मी नेतान्याहू यांना म्हटलं होतं की ही त्यांच्यासाठी विजयाची संधी आहे आणि इस्रायलच्या पंतप्रधानांनी त्यास सहमती दर्शवली आहे.