अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ते रशियावर कठोर निर्बध लादण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावेळी त्यांनी नाटोला रशियावरील चीनची आर्थिक पकड कमजोर करण्यासाठी त्यावर ५०-१०० टक्के टॅरिफ कर लादण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते असे केल्याने युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

ट्रम्प यांनी नाटो देशांना शनिवारी एक पत्र जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे आणि रशियवर कठोर निर्बंध लादावेत अशी मागणी केली. ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “जेव्हा सर्व नाटो देश रशियावर कठोर निर्बंध लावण्यास तयार असतील आणि जेव्हा ते हे करण्यास सुरूवात करतील आणि जेव्हा सर्व नाटो देश रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करतील तेव्हा मी रशियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी तयार आहे.”

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या मते, नाटोचा सदस्य असलेल्या देश तुर्कीये हा चीन आणि भारतानंतर रशियन तेल खरेदी करणारा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. रशियन तेल खरेदी करण्यात सहभागी असलेल्या ३२-राज्यांच्या आघाडीवर असलेल्या सदस्यांमध्ये हंगेरी आणि स्लोवाकिया यांचा समावेश आहे.

“हे आणि नाटोने एक गट म्हणून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपल्यावर पूर्णपणे मागे घेतले जातील असे ५० टक्के ते १०० टक्के टॅरिफ चीनवर लावले तर ते जीवघेणे पण हास्यास्पद युद्ध संपवण्यासाठी खूप मदतीचे ठरेल,” असेही ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आणखी निर्बंध लादण्याची धमकी दिली होती, तसेच रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर देखील निर्बंध लादणार असल्याचे सांगितले होते. या देशांमध्ये चीन आणि भारताचा समावेश होता.

रशियाचे अनेक ड्रोन पोलंडमध्ये घुसल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात भारतावर मालाच्या आयातीवर २५ अतिरिक्त कर लादला आहे. रशियाकडून भारत कच्चे तेल आयात करत असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे कारण ट्रम्प यांनी दिले होते . मात्र, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या चीनवर अशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही