पीटीआय, वॉशिंग्टन
“भारत आणि अमेरिकेची खूप चांगली मैत्री आहे, पण अनेक वर्षांपासून हे संबंध एकतर्फी आहेत,” असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून भारताने अमेरिकी मालावर प्रचंड आयातशुल्क लादले अशी टीका ट्रम्प यांनी केली. मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टिप्पणी केली.
अमेरिकी मालावरील आयातशुल्क आणि रशियाकडून केलेली तेलखरेदी, ही दोन कारणे देत ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. “त्यापैकी काही मागे घेणार का,” असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी “नाही,” असे उत्तर दिले. त्याचवेळी, “आमची भारताशी फार चांगली मैत्री आहे,” अशी पुस्तीही जोडली. अमेरिकेने भारतावर लादलेले ५० टक्के आयातशुल्क हे जगातील सर्वाधिक आयातशुल्कांपैकी एक आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेले असून, द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चेमध्येही अडथळे येत आहेत.
भारताकडून अमेरिकी मालावर प्रचंड आयातशुल्क आकारले जात होते, ते त्यांचा भरपूर माल आमच्या देशात पाठवत होते, त्याचा परिणाम अमेरिकेतील उत्पादन क्षेत्रावर झाला, असे आरोप ट्रम्प यांनी भारतावर केले. काही अमेरिकी वस्तूंवर १०० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क लादले जात होते, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलीचे उदाहरण दिले, त्यावर भारतामध्ये २०० टक्के आयातशुल्क आकारले जात होते.
भारत आमच्या मालावर प्रचंड आयातशुल्क लादत होता. पण आम्ही त्यांच्यावर आयातशुल्क आकारले नव्हते, त्यामुळे ते आमच्याबरोबर व्यापार करत होते. ते त्यांचा माल आमच्या देशात पाठवत होते. त्यामुळे त्या वस्तूंचे येथे उत्पादन केले जात नव्हते. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
भारतामुळे आमचे नुकसान
भारताने आधी अमेरिकेवर प्रचंड आयातशुल्क लादून आमचे नुकसान केले आणि ते आमच्या मालावर आयातशुल्क न लादण्याचा प्रस्ताव देत आहेत असा दावा ट्रम्प यांनी ‘द स्कॉट जेनिंग्ज रेडिओ शो’ला दिलेल्या मुलाखतीत केला. इतर देशांपेक्षा आपल्याला आयातशुल्क अधिक कळते असे ते म्हणाले. भारत, चीन, ब्राझील या देशांनी भरपूर आयातशुल्क लादून आमचे नुकसान केले असे ते म्हणाले. जर मी आयातशुल्क लादले नाही तर हे देश कधीही आयातशुल्काचा प्रस्ताव देणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कर आकारणी करावीच लागेल. यामुळे अमेरिका आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल असे ट्रम्प या मुलाखतीत म्हणाले.