Donald Trump Announce Golden Dome Project: भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात भारताकडे असलेल्या एस-४०० सुदर्शन चक्राची कमाल जगाने पाहिली. या एअर डिफेन्स सिस्टिमुळे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानने सोडलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र निकामी केले. मागच्या वर्षी इस्रायलनेही त्यांच्या आर्यन डोमच्या मदतीने शेजारी राष्ट्रातून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे हवेतच निकामी केली होती. आता अमेरिकाही आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ‘गोल्डन डोम’ ही यंत्रणा उभारणार असून यासाठी १७५ अब्ज डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. मंगळवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकल्पाची घोषणा करत त्याची माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन या नव्या यंत्रणेची माहिती दिली. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, यूएस स्पेस फोर्सचे जनरल मायकल गुएटलिन यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. “गोल्डन डोम हे आपले कवच असून ते अमेरिकेची भूमी सुरक्षित करेल. तसेच कॅनडाला याचा भाग व्हायचा असल्यास ते होऊ शकतात”, असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.
गोल्डन डोम तयार करण्यासाठी १७५ अब्ज डॉलर्सचा खर्च येणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. जानेवारी २०२९ मध्ये ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून त्याच्याआधी हा प्रकल्प पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे माजी (४० वे) राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन यांना फार पूर्वीच असे कवच तयार करायचे होते, मात्र त्यावेळी हे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. यासाठी रेगन यांच्या स्टार वॉर्स या अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा संदर्भ यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत सहभागी झालेले संरक्षण सचिव पेट हेगसेट म्हणाले की, दुसऱ्या राष्ट्रातून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राला रोखण्यात ही प्रणाली यशस्वी ठरणार आहे. जरी अंतराळातून क्षेपणास्त्र डागण्यात आले तरी ही आपण त्याचा मुकाबला करू, असेही ते म्हणाले.
जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो उपग्रहांचे नेटवर्क तयार केले जाईल. हे नेटवर्क अमेरिकेच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांची खात्री करून त्यांचा माग काढले आणि हवेतच सदर क्षेपणास्त्र नष्ट केले जाईल.