Donald trump inspired party big win in Japan key election : जपानमध्ये सत्ताधारी लिबरल डेमॉक्रेटिक पार्टी (LDP)ला रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत नवीन उजव्या विचारसरणीच्या गटांना फायदा मिळाल्याचे पाहायला मिळाले. या निकालामुळे अनेक दशकांपासून स्थिर असलेली जपानमधील राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.
वरिष्ठ सभागृहाच्या निवडणूक लढवण्यात आलेल्या एकूण १२४ जागांपैकी एक तृतियांश जागा या विरोधी पक्षांना मिळाल्या आहेत. पण महत्त्वाची बाब म्हणजे याचा फायदा हा प्रामुख्याने पारंपरिक लिबरल विरोधकांना झालेला नाही तर तो राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर तरुणांना साद घालणार्या नव्या पक्षांना मिळाला.
यामध्ये माजी सुपरमार्केट मॅनेजर आणि इंग्रजी शिक्षक आणि सोहेई कामिया यांच्या नेतृत्वाखालील पॉप्युलिस्ट पार्टी सॅनसेइटो (Sanseito) या पक्षाचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, निवडणुकीच्या आधीच कामिया यांनी आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बोल्ड पॉलिटीकल स्टाईल’ने प्रभावित असल्याचे म्हटले होते.
वरिष्ठ सभागृहातील २४८ पैकी अर्धे सदस्य फेर-निवडणूक लढवत होते. निवडणुकीत यश मिळवणाऱ्या प्रमुख पक्षांमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी फॉर द पीपल (DPP) आणि सॅनसेइटो हे दोन होते. जपानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या निवडणुकीत डीपीपी पक्षाच्या जागा वाढून ४ वरून १७ झाल्या आणि सॅनसेइटो पक्षाच्या जागा १ वरून १४ इतक्या वाढल्या आहेत.
सानसेइटो या पक्षाची सुरूवात कोरोना माहामारीच्या काळात यूट्यूबवर झाली, येथे ते व्हॅक्सिन आणि ग्लोबल इलिट्स यांच्याबद्दल कॉन्स्पिरसी थेअरी पसरवायचे, असे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे.
त्यानंतर या पक्षाने ‘जापनीज फर्स्ट’ या मोहिमेसह देशातील मुख्य राजकीय प्रवाहात प्रवेश केला. “जापनीज फर्स्ट ही घोषणा जागतिकीकरणाला विरोध करून जपानी लोकांच्या दैनंदिन जीवनमान पुन्हा उभे करण्याची भावना व्यक्त करण्यासाठी होती. माझं असं म्हणणं नाही की सर्व परदेशी लोकांवर पूर्णपणे बंदी घालावी किंवा परदेशी नागरिकांनी जपानमधून निघून जावे.” असे सोहेई कामिया यांनी निवडणुकीनंतर एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. याचे कारण म्हणजे जपानमध्ये सध्या वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे परदेशात जन्मलेल्या लोकाची संख्या वाढत आहे, जी गेल्या वर्षी विक्रमी ३.८ दशलक्ष पर्यंत पोहचली आहे. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के इतकी आहे.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या नेतृत्वाखालील एसडीपी आणि त्यांचे सहकारी कोमेइटो (Komeito) यांना त्यांच्याकडे असलेल्या ७५ जागांसह बहुमत राखण्यासाठी अजून ५० जागांची आवश्यकता होती. त्यांनी ४७ जिंकल्या. म्हणजेच त्यांना बहुमत गाठण्यासाठी तीन जागा कमी पडल्या. त्यांच्याकडे निवडणुकीच्या आधीपेक्षा १९ जागा कमी आहेत.
ऑक्टोबरमध्ये या युतीच्या कनिष्ठ सभागृहातील पराभवानंतर हा निकाल लागला आहे. त्यामुळे १९५५ मध्ये एलडीपीच्या स्थापनेपासून ते दोन्ही सभागृहात पहिल्यांदाच अल्प-मतात आले आहेत.
निकाल विरोधात लागला असला तरी इशिबा यांनी आपण सत्तेत राहाणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडून टॅरिफ लावण्याची धमकी दिली जाणे, यासारख्या समस्यांचा जपान सामना करत असताना त्यांना राजकीय पोकळी निर्माण करायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांना राजीनामा देण्यासाठी किंवा नवीन राजकीय आघाडी स्थापन करण्यासाठी अंतर्गत राजकीय दबावाचा सामना करावा लागू शकतो.
या पराभवामुळे लगेचच सरकार बदलणार नाही, कारण वरिष्ठ सभागृहात अविश्वास ठराव मंजूर होऊ शकत नाही. पण यामुळे इशिबा यांच्या नेतृत्वाबद्दल अस्थिरता निर्माण होऊ शकते.