Donald Trump Claim on India-Pakistan War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. सध्या जागतिक स्तरावर आपली छाप सोडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळे दावे करत असतात. नुकताच त्यांनी इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यात चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम लावण्यासाठी २० मुद्द्यांचा कार्यक्रम सुचवला आहे. एकीकडे त्याची चर्चा असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कौतुकामुळे डोनाल्ड ट्रम्प हुरळून गेल्याचं दिसून आलं आहे. खुद्द ट्रम्प यांनीच पाकिस्ताननं केलेल्या कौतुकाचा जाहीर पत्रकार परिषदेत दाखला देऊन आपल्याला त्याचा आनंद झाल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी नुकतीच व्हाईट हाऊस येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. ही नेमकी काय चर्चा झाली, याचे तपशील अद्याप समोर आले नसले, तरी त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या चर्चेसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध आपण थांबवल्याचा दावा केला आणि त्याबद्दल पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी आपलं कौतुक केल्याचंही ट्रम्प म्हणाले.
आसिम मुनीर यांचं कौतुक आणि ट्रम्प यांचा आनंद!
पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्कर प्रमुखांच्या भेटीबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यातील चर्चेचे मुद्दे सांगितले. “पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांच्या लष्करप्रमुखांसोबत व्हाईट हाऊसमध्ये आले होते. त्यांचे लष्करप्रमुख हे पाकिस्तानमधील फार महत्त्वाचे व्यक्ती आहेत. लष्करप्रमुखांनी इथे काही लोकांसमोर माझा उल्लेख करून सांगितलं की ‘यांनी लाखो जीव वाचवले. कारण त्यांनी आमच्यात चालू असलेलं युद्ध थांबवलं’. ते युद्ध भार भयंकर होऊ लागलं होतं. पण त्यांचे ते शब्द म्हणजे माझा गौरव होता. ते ज्या पद्धतीने म्हणाले, ते मला आवडलं”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
“त्यावेळी व्हाईट हाऊसच्या प्रमुख व्यवस्थापक सूसी विल्सदेखील तिथे होत्या. त्या म्हणाल्या की पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी ट्रम्प यांच्याबाबत असं म्हणणं ही खूपच सुंदर बाब आहे. आम्ही या युद्धात खूप जणांचे प्राण वाचवले”, असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.
पुन्हा युद्धबंदीचा दावा
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपणच युद्ध थांबवल्याचा दावा अधोरेखित केला. “चार दिवस वातावरण अधिकाधिक तणावपूर्ण होत होतं. सात विमानं पाडल्याचेही दावे केले जा होते. भारत व पाकिस्तान एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले होते. मी त्या दोघांशीही बोललो. या प्रसंगात मी व्यापाराच वापर केला. मी त्यांना इशारा दिला की अमेरिका तुमच्याशी व्यापार करणार नाही. तुम्ही दोन प्रबळ असे अण्वस्त्रधारी देश आहात. तुम्ही हा असा संघर्ष करू शकत नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.