अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील पहिली महिला होण्याचा मान भारतीय वंशाच्या निक्की हॅले यांना मिळाला आहे. निक्की हॅले यांची संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या हॅले दक्षिण कॅरिलोना राज्याच्या राज्यपाल आहे. ४४ वर्षांच्या हॅले या ट्रम्प यांच्या प्रशासनाकीय विभागात नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला आहेत.

सध्या समंथा पावर या संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत आहेत. निक्की हॅले आता पावर यांची जागा घेत संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे नेतृत्व करतील. वॉल स्ट्रिट जर्नल हे वृत्त दिले आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय-अमेरिकन व्यक्तीला अमेरिकेन अध्यक्षांच्या प्रशासकीय विभागात कॅबिनेट दर्जाचे स्थान मिळालेले नाही. प्रशासकीय विभागात कॅबिनेट दर्जाचे स्थान मिळवण्यासाठी सिनेटची परवानगी लागते.

निक्की हॅले यांचे सहकारी मिट रॉम्नी यांची राज्य सचिवपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. याआधी हे पद निक्की हॅले यांना दिले जाणार अशी चर्चा होती. रॉम्नी यांनी याआधी मॅसेचुएट्स राज्याचे राज्यपद भूषवले आहे. याशिवाय निवृत्त जनरल जेम्स मॅटिस यांची सुरक्षा सचिव म्हणून नेमणूक होण्याचे वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलकडून देण्यात आले आहे.

निक्की हॅले यांनी नुकतीच न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ‘ट्रम्प यांच्यासोबतची बैठक उत्तम झाली. त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली,’ अशी माहिती या भेटीनंतर निक्की हॅले यांनी दिली.