Donald Trump On China : गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य करत चिनी वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लादलं होतं. त्यानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादत प्रत्युत्तर दिलं होतं. या टॅरिफ वॉरमुळे या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारी संबंध ताणले गेले होते. आजही अमेरिका आणि चीनमध्ये विविध मुद्यांवरून मतभेद आहेत.

असं असताना एकीकडे दोन्ही देश एकमेकांबरोबर संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढण्याचा निर्णय घेतात आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे तैवानच्या मुद्यांवरून चीनला थेट धमकी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतंच तैवानच्या मुद्यांवरून चीनला अप्रत्यक्ष इशारा दिल्याचं दिसून येत आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र असलेल्या तैवानवर चीनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

रविवारी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “कमीत कमी मी अमेरिकेचा अध्यक्ष असताना तरी चीन तैवानवर आक्रमण करणार नाही, कारण त्यांना त्याचे गंभीर परिणाम माहिती आहेत.” ट्रम्प यांना विचारण्यात आलं की जर चीनने तैवानवर लष्करी कारवाई केली तर तैवानचं रक्षण करण्यासाठी अमेरिका काय करेल किंवा अमेरिका सैन्य तैनात करेल का? या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “हे घडेल की नाही ते तुम्हाला तेव्हा कळेल. मात्र, असं झालं तर त्यांना (चीनला) त्याचं उत्तर माहिती आहे.”

“तुम्ही मला प्रश्न विचारत आहात म्हणून मी तुम्हाला सर्व काही सांगणारा माणूस नाही. मात्र, त्यांना काय होणार हे समजतं. कारण मी राष्ट्राध्यक्ष असताना ते काहीही करणार नाही. कारण त्यांना त्याचे परिणाम माहित आहेत”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी एकप्रकारे चीनला गंभीर इशाराच दिला आहे.