Donald Trump first reaction on Indian man beheading in Texas : अमेरिकेमध्ये टेक्सास येथे भारतीय वंशाच्या हॉटेल व्यवस्थापक चंद्रा मौली नगमाल्ले (५०) यांची त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच शिरच्छेद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. वॉशिंग मशीनवरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली होती. दरम्यान या हत्येच्या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांबाबत मवाळ भूमिका घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर यासंबंधी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये क्युबा येथील एका बेकायदेशीर स्थलांतरिताने चंद्रा यांची निर्घृणपणे हत्या केली, जो आपल्या देशात असायलाच नको होता, असे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच ट्रम्प यांनी पीडित हे डल्लास येथील एक प्रतिष्ठित नागरिक होते असेही म्हटले आहे.

“चंद्रा नगमाल्ले यांच्या भीषण हत्येसंबंधी मला माहिती आहे. या व्यक्तीला (आरोपी) यापूर्वी मुलांवरील लैंगिक अत्याचार, ग्रँड थेफ्ट ऑटो आणि चुकीचा तुरुंगवास अशा गंभीर गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली होती. पण जो बायडन यांच्या अकार्यक्षम प्रशासन काळात त्याला आपल्या मायदेशात सोडण्यात आले, कारण क्युबाला असा वाईट व्यक्ती त्यांच्या देशात नको होता. आता निश्चिंत रहा, माझ्या देखरेखीखाली अशा बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांबद्दल मवाळ राहण्याची वेळ आता संपली आहे!” असे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत .

ट्रम्प यांनी पुढे त्यांचे प्रशासन हे होमलँड सेक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम, अॅटर्नी जनरल पॅम बोंडी आणि बॉर्डर झार टॉम होमन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला पुन्हा सुरक्षित बनवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही नमूद केले.

दरम्यान अमेरिकेच्या होमलँड सेक्युरिटीने पुष्टी केली आहे की. या घटनेतील आरोपी ३७ वर्षीय योर्दानिस कोबोस-मार्टिनेझ हा क्युबाचा रहिवासी आहे आणि त्याला खरोखरच जो बायडन प्रशासनाच्या काळात क्युबा सरकारने त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डमुळे देशात परत घेण्यास नकार दिल्याने सोडून दिले होते. पब्लिक रेकॉर्डनुसार असेही आढळून आले आहे की, कोबोस-मार्टिनेझ याचा यापूर्वी ह्युस्टन, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया येथे देखील गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिला आहे.

नेमकं झालं काय?

१० सप्टेंबर रोजी डलासमधील डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये ही घटना घडली होती जेथे नगमाल्ले आणि कोबोस-मार्टिनेझ हे दोघेही काम करत होते. वॉशिंग मशीन तुटण्यावरून त्यांचा त्यांचे सहकारी योर्दानिस कोबोस-मार्टिनेझ याच्याशी वाद झाला होता. कोबोस याच्याशी थेट संवाद साधण्याऐवजी अन्य एका व्यक्तीला आपले बोलणे भाषांतर करून त्याला सांग, असे चंद्रा यांनी म्हटल्याने कोबोस याचा संताप अनावर झाला. एका मोठ्या सुऱ्याने कोबोने चंद्रा यांच्यावर हल्ला केला. चंद्रा घाबरून हॉटेलच्या कार्यालयाजवळ गेले. त्या ठिकाणी त्यांची पत्नी आणि १८ वर्षांचा मुलगा होता. पत्नी आणि मुलाने या दोघांच्या भांडणात मध्यस्थी केली. पण, कोबोने या दोघांना बाजूला केले आणि चंद्रा यांना मारणे सुरू ठेवले. शीर धडापासून वेगळे होत नाही, तोपर्यंत तो मारत राहिला. आरोपीने धडावेगळे केलेल्या शिराला लाथा मारल्या. त्यानंतर ते हातात घेऊन मोठ्या कचराकुंडीत टाकले. हा गुन्हा कल्पनेपलीकडचा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.