३४ गंभीर आरोपप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा
पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या प्रशासनावर अमेरिका उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला असून, जो बायडेन यांच्या कारकीर्दीत जगाला तिसरे महायुद्धास तोंड द्यावे लागेल. यात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा दावा केला. ७६ वर्षीय ट्रम्प यांनी एका प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आरोप निश्चित झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक भाषणात हे सांगितले.गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजेरी लावताना व्यावसायिक नोंदींमध्ये फेरफार करण्यासंदर्भातील ३४ गंभीर आरोपप्रकरणी निर्दोष असल्याचाही दावा केला. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारादरम्यान तिने अश्लील चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री (पोर्न स्टार) स्टॉर्मी डॅनियल्सला मौन राखण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपाशी संबंधित फौजदारी सुनावणीसाठी ट्रम्प मंगळवारी न्यायालयात दाखल झाले होते.
न्यूयॉर्कहून परतल्यानंतर फ्लोरिडा येथील त्यांच्या ‘मार-ए-लागो रिसॉर्ट’मध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, की अनेक देश उघडपणे अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देत आहेत. आपल्या कारकीर्दीत अशी धमकी कोणीही दिली नाही. आपल्या काळात असे वक्तव्य, साधा उल्लेखही कोणी केला नाही. बायडेन प्रशासनाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अण्वस्त्रयुक्त तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होण्याची दाट शक्यता दिसत आहे. अध्यक्ष बायडेन यांच्या राजवटीत देश गोंधळात पडला आहे. आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. रशियाने चीनशी हातमिळवणी केली आहे. सौदी अरेबियाने इराणशी हातमिळवणी केली आहे. चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांनी विध्वंसक युती केली आहे. आपल्या काळात हे कधीच घडले नसते. युक्रेनमधील विध्वंसाचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘जर मी तुमचा अध्यक्ष असतो तर असे कधीच घडले नसते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला नसता.
निर्विकार चेहऱ्याने प्रश्नांना उत्तरे
माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅनहटन न्यायालयात आरोपांनुसार व्यावसायिक नोंदी फेरफार व खोटय़ा नोंदी केल्याच्या ३४ गंभीर गुन्ह्याच्या आरोपांत निर्दोष असल्याचा दावा केला. त्यांना राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जुआन एम. मर्चन यांच्या समोर हजर करण्यात आले. गडद निळय़ा रंगाच्या सूट व लाल टाय घालून आलेले ट्रम्प निर्विकार चेहऱ्याने कडेकोट बंदोबस्तात न्यायालयासमोर जड आणि संथ पावले टाकत गेले. त्यांनी न्यायाधीशांसमोर ठाम स्वरांत दोषी नसल्याचा दावा केला. संपूर्ण न्यायालयीन कार्यवाहीत ते शांत बसले होते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ते बोलले. दोषी नसल्याची बाजू मांडून किंवा थेट न्यायाधीशांना उत्तरादाखल संबोधताना फक्त ते बोलले. निर्विकार चेहऱ्याने न्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तरे ट्रम्प यांनी दिली.