Donald Trump Paises Narendra Modi : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या आशियाई देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी (२९ ऑक्टोबर) दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात दक्षिण कोरियाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, “अमेरिका व भारत लवकरच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या व्यापार करारावर स्वाक्षरी करतील.” गेल्या काही महिन्यांपासून या करारावर चर्चा चालू आहेत. युक्रेन व रशियामधील युद्ध, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा, त्याला अमेरिकेचा विरोध आणि त्यातून अमेरिकेने भारतावर लागू केलेलं ५० टक्के आयात शुल्क या सर्व गोष्टींमुळे हा करार होण्यास उशीर झाला आहे. मात्र, आता हा करार पूर्ण होत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “तुम्ही भारत व पाकिस्तानकडे बघाल तर मी भारताबरोबर व्यापार करार करत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम व सन्मान आहे. आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदी हे दिसायला सर्वात देखणे आहेत. ते तितकेच कणखरही आहेत. तरीसुद्धा त्यांनी पाकिस्तानबरोबरचा संघर्ष दोन दिवसांत थांबवला. ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे.”
ट्रम्प यांची मोदींवर स्तुतीसुमने
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. कठीण प्रसंगांमध्ये ते अतिशय खंबीर असतात. अर्थात, आमच्यात वाद होतीलही. भारत-पाकिस्तान संघर्षावेळीही असंच झालं होतं. तेव्हा मला वाटलं हा तोच माणूस आहे का ज्याला मी ओळखतो! पण अगदी दोनच दिवसांत त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांनी संघर्ष थांबवला. ही बाब खूपच चांगली झाली. आता तुम्ही मला सांगा, मी तेव्हा जे केलं, ते जो बायडेन यांनी केलं असतं का? मला वाटत नाही त्यांनी असं काही केलं असतं.”
भारत व अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात?
भारतीय बाजारात अमेरिकेच्या मूल्यसंवेदनशील उत्पादनांना प्रामुख्याने दुग्ध व कृषी उत्पादनांना प्रवेश देण्यास भारताने नकार दिल्यामुळे उभय देशांमधील व्यापार करारासंबंधीची चर्चा थांबली होती. तसेच गेल्या आठवड्यात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, ज्यामध्ये म्हटलं होतं की भारताने रशियन तेल खरेदी कमी करण्यास सहमती दर्शवली तर अमेरिका भारतावरील आयात शुल्क १६ टक्क्यांपर्यंत कमी करेल.
