पीटीआय, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन
‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, ‘गूगल’चे प्रमुख सुंदर पिचाई यांच्या कामाची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले आहे. अमेरिकी-भारतीय असलेल्या या दोघांनी ट्रम्प यांच्या तंत्रज्ञान आणि ‘एआय’ धोरणाची स्तुती केली. व्हाइट हाउसमध्ये या दोघांना भोजनाचे आमंत्रण होते. ट्रम्प म्हणाले, ‘मोठा ‘आयक्यू’ असणारा हा गट उद्याोग क्षेत्रातील क्रांतीचे नेतृत्व करीत आहे. या चर्चेसाठी बुद्धिमान लोक एकत्र आले आहेत. मला त्यांचा अभिमान आहे.’
‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स आणि ‘मेटा’चे ‘सीईओ’ मार्क झुकरबर्ग हेदेखील या वेळी उपस्थित होते. पिचाई यांच्यासह ‘अॅपल’चे सीईओ टिम कूक हेदेखील या ठिकाणी होते.
नाडेला आणि पिचाई यांना ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये किती गुंतवणूक करीत आहात, असा प्रश्न विचारला. त्यावर पिचाई यांनी येत्या दोन वर्षांत २५० अब्ज डॉलर गुंतवणूक अमेरिकेत कंपनी करील, असे सांगितले, तर नाडेला यांनी कंपनी दर वर्षी ७५ ते ८० अब्ज डॉलर अमेरिकेत गुंतवणूक करते, असे सांगितले. त्यावर ट्रम्प यांनी स्तुतिपर उद्गार काढले.