Donald Trump Address to Joint Session: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित केलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आगामी आंतरराष्ट्रीय भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारत, चीन, कॅनडा, दक्षिण कोरिया अशा देशांवर अमेरिकेकडून Reciprocal Tariff म्हणजे सोप्या शब्दांत जशास तसे शुल्क लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या २ एप्रिलपासून नवे टेरिफ दर लागू होतील, असंही त्यांनी जाहीर केलं. यावेळी आपण २ तारीखच यासाठी का निवडली, याबाबत ट्रम्प यांनी मिश्किल भाष्य केलं आहे.

“आमच्या सरकारमध्ये कंपन्यांवर टेरिफ आकारलं जाईल. पण ज्या कंपन्या त्यांचं उत्पादन अमेरिकेत करणार नाहीत, त्या कंपन्यांवर जास्त शुल्क आकारलं जाईल”, असं ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले. “हे शुल्क दोन्ही बाजूंनी सारखेच लागू केले जाईल. उदाहरणार्थ, जेवढे शुल्क इतर देश आपल्यावर लागू करतील, तेवढंच शुल्क आपल्याकडूनही त्यांच्यावर लागू केलं जाईल”, असं ट्रम्प म्हणाले.

अंमलबजावणीसाठी २ एप्रिलच का?

दरम्यान, शुर नवे दर १ एप्रिलऐवजी २ एप्रिललाच लागू करण्याचा निर्णय का घेतला? यावर ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मला खरंतर हे नवे बदल १ एप्रिलपासूनच लागू करायचे होते. पण त्यामुळे माझ्यावर एप्रिल फूलचे आरोप व्हावेत, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. एका दिवसामुळे आपलं खूप मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. पण तरीही आपण २ एप्रिललाच हे बदल लागू करणार आहोत. मी एक खूप श्रद्धाळू माणूस आहे”, असं ट्रम्प यांनी म्हणताच समोर बसलेल्या सिनेट सदस्यांमध्ये एकच हशा पिकला.

“भारत १०० टक्क्यांहून जास्त शुल्क आकारले जातात”

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कांवर टिप्पणी केली. “भारताकडून आपल्यावर ऑटो क्षेत्रात १०० टक्क्यांहून अधिक शुल्क आकारले जातात. दुसरीकडे अमेरिकेकडून चीनवर जेवढे टेरिफ दर लागू केले जातात, त्याच्या दुप्पट दर हे चीनकडून अमेरिकन उत्पादनांवर लागू केले जात आहेत. दक्षिण कोरियाकडून आकारल्या जाणाऱ्या टेरिफचं प्रमाण तर चौपट आहे”, असं ट्रम्प म्हणाले.

“आपण दक्षिण कोरियाला खूप सारी लष्करी मदत करतो. पण त्याबदल्याच हे सगळं घडत आहे. आपल्या बाबतीत हे जसं आपल्या शत्रूंकडून होतंय, तसंच ते मित्रांकडूनही होतंय. ही व्यवस्था अमेरिकेसाठी न्याय्य नाही”, असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेक्सिको-कॅनडावर २५ टक्के टेरिफ

दरम्यान, मेक्सिको व कॅनडा या दोन शेजारी देशांवर ट्रम्प प्रशासनाने नवे शुल्क लागू केले आहेत. त्यानुसार या दोन्ही देशांवर अमेरिकेने २५ टक्के टेरिफ लागू केले आहेत.