Donald trump reaction after missing out on Nobel Peace Prize : यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यासाठी अनेक दशकांपासून लढणाऱ्या व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाड यांना जाहीर झाला. ओस्लो येथे शुक्रवारी नोबेल समितीने ही घोषणा केली. यानंतर जगातील अनेक युद्धे आपणच थांबविल्याचा दावा करत या पुरस्कारासाठी आग्रही असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग झाला आहे. नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्टाध्यक्ष म्हणाले की, “नोबेल पारितोषिक जिंकलेल्या व्यक्तीने आज मला फोन केला आणि सांगितले की,’मी तो (पुरस्कार) तुमच्या सन्मानार्थ स्वीकारत आहे, कारण तुम्ही खरोखरच पात्र होतात’, आणि ही एक खूप चांगली गोष्ट आहे,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

पुढे ट्रम्प हसून म्हणाले की, “मी तेव्हा ‘तो मला द्या’ असं काही म्हणालो नाही,” यावर उपस्थित सर्व जण हसल्याचे पाहायला मिळाले. ट्रम्प पुढे म्हणाले की, ते मारिया कोरिना मचाडो यांना सातत्याने मदत करत आले आहेत आणि त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला की, “मी आनंदी आहे, कारण मी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत.”

पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित

मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकांसह डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केल्याचे म्हटले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या संघर्षासाठी प्रोत्साहन आहे. आज, आम्ही विजयाच्या आणखी जवळ आलो आहोत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेतील व लॅटिन अमेरिकेतील लोक आणि जगातील लोकशाही देशांचे आम्हाला लोकशाही आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याचे आभार मानते.”

आपल्या पोस्टच्या शेवटी मचाडो यांनी लिहिले की, “व्हेनेझुएलाच्या पीडित लोकांना आणि आमच्या कार्याला निर्णायक पाठिंबा दिल्याबद्दल मी हा पुरस्कार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करते.”

जगभरातील अनेक देशांमधील संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचा हवाला देत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता, असा दावा करत राहिले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी आठ शांतता करारांमध्ये मध्यस्थी केल्याचा आपला दावा पुन्हा एकदा मांडला, ज्यामध्ये इस्रायल आणि गाझा तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणल्याचा दावाही त्यांनी केला.

‘व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीच्या नेत्या म्हणून मारिया कोरिना मचाडो अलीकडच्या काळातील लॅटिन अमेरिकेमधील नागरी धैर्याचे सर्वांत मूर्तिमंत उदाहरण आहेत,’ असे नॉर्वेजियन नोबेल समितीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी यावर्षी ३३८ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यामध्ये २२४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता. परंतु व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणे, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना २०२५ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.