Donald Trump reduces us tariffs on china by 10 percent after meeting xi jinping : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ वॉर सुरू आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध ताणले गेलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन नेत्यांच्या या बैठकीनंतर ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. चीनवर लादण्यात आलेले अमेरिकेचे टॅरिफ १० टक्क्यांनी कमी केले जाईल असे ट्रम्प म्हणाले आहेत. ज्यामुळे चीनवरील टॅरिफ ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांवर खाली आले आहेत.
शी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी सांगितले की, चीनवरील कमी केलेले टॅरिफ हे तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. तसेच त्यांनी असेही सांगितले की, चीनवरील फेंटानिल fentanyl) वरील टॅरिफ आता २० टक्क्यांवरून १० टक्के केले जाईल.
ट्रम्प म्हणाले की, शी जिनपिंग हे फेंटानिलचा फ्लो रोखण्यासाठी खूप कठोर मेहनत घेतील आणि हे टॅरिफ कमी करण्यात आले कारण माझा विश्वास आहे की ते खरंच कठोर पाऊले उचलत आहेत, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ही बैठक १०० मिनिटांपेक्षा थोडा जास्त वेळ चालली. भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले, आणि शी जिनपिंग हे त्यांच्या स्वतःच्या लिमोझिनमध्ये ) बसण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितल्याचे दिसून आले. त्यानंतर थोड्याच वेळात ट्रम्प एअर फोर्स वन विमानात बसून वॉशिंग्टनकडे परतले.
या भेटीच्या आधी ट्रम्प यांनी चिनी मालावर १०० टक्के टॅरिफ शुल्क लादण्याची धमकी दिली होती, पण आता त्यांना असे करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले, असे वृत्त एपीने दिले आहे.
या बैठकीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आशावाद व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, “आमच्यातील बैठक अत्यंत यशस्वी होणार आहे, मला कसलीही शंका नाही.” तसेच त्यांनी शी हे खूपच चिवट वाटाघाटी करणारे आहेत असेही ट्रम्प म्हणाले होते. कदाचित ते आजत करारावर स्वाक्षरी करू शकतात असेही ट्रम्प म्हणाले होते.
