Donald Trump on Hamas: गाझामधील दहशतवादी संघटना हमासवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकले आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. हमासला धडा शिकविण्यासाठी इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या लष्करी कारवाईमुळे आजवर हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. तरीही हमासकडून शस्त्रविरामाबाबत सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. त्यांनी इस्रायलला लष्करी कारवाईचा वेग वाढविण्याची सूचना दिली आहे.
अमेरिकेच्या माध्यमातून हमासला शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव हमासने नाकारला आहे. त्यानंतर ट्रम्प यांच्या संतापाचा भडका उडाला. “हमास संघटनेला शांतता नको आहे, त्यांना चर्चेत रस नाही. त्यांना मरायचेच आहे, असे मला वाटते”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉटलंडचा दौरा आटोपण्यापूर्वी दिली.
अमेरिकेच्या प्रयत्नांना खिळ
गाझापट्टीतील परिस्थिती पूर्ववत करून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. यासाठी अमेरिकेच्या स्टिव्ह विटकॉफ यांच्या नेतृत्वाखालील एक पथक मध्य आशियात पाठविण्यात आले होते. मात्र आता विटकॉफ यांच्या पथकाने चर्चेतून माघार घेण्याचे ठरविले आहे. चर्चेऐवजी दुसरा मार्ग अवलंबला जावा, असे त्यांनी सुचविले आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रागाचा पारा चढला.
चर्चेतून आता काही साध्य होणार नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, चर्चेच्या अंतिम टप्प्यात हमास माघार घेत आहे. यावरून त्यांना हिंसेत अधिक रस असल्याचे दिसत आहे. गाझाची परिस्थिती खूप बिकट आहे. लहान मुले भूखेने व्याकूळ झाले आहेत. आता चर्चेतून मार्ग निघत नसेल तर इस्रायलला सूचना असेल की, त्यांनी हमासचा नायनाट करून टाकावा. इस्रायलच्या लष्करी कारवाईला अमेरिकेचेही पूर्ण समर्थन असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले.