Donald Trump on India Tariffs: भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. सोमवारी व्हाईट हाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. रशियाची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत असून टॅरिफ वाढीच्या निर्णयामुळे त्याला आणखी खीळ बसेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर अलास्का येथे होणाऱ्या शिखर परिषदेबद्दल बोलत असताना त्यांनी भारताचे नाव न घेता म्हटले की, टॅरिफ वाढीमुळे रशियाचा सर्वात मोठा आणि दुसऱ्या क्रमाकांचा तेल खरेदीदार देशाला फटका बसला आहे. अमेरिकेने अनेक देशावंर कर लादल्यामुळे जागतिक दबाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत.

विशेष म्हणजे पुतिन यांच्या भेटीआधी ट्रम्प यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत एकप्रकारे त्यांना उकसविण्याचा प्रयत्न करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

रशियाने देशाची पुर्नबांधणी करावी

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, मला वाटते रशियाने देशाची पुर्नबांधणी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हा खूप मोठा देश असून त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. मात्र त्यांच्याकडून तेवढी चांगली कामगिरी होत नाही. त्यांच्या अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली असून ते त्यांच्या मार्गावरून भरकटले आहेत.

भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला कसा धक्का बसला, याबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियाकडून तेल आयात कराल तर तुमच्यावर ५० टक्के टॅरिफ लादू असे सांगितल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसणार आहे.

अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेनमध्ये संभाव्य युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेतील अलास्का येथे शिखर परिषद नियोजित आहे. ही परिषद १५ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर करण्यासाठी पुतिन यांना ट्रम्प यांनी ८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. तसे न झाल्यास रशियावर आणखी कठोर आर्थिक निर्बंध लादू, असा इशारा ट्रम्प यांनी मागे दिला होता.